मुंबई प्रतिनिधी
मुंबई : धारावी परिसरात किरकोळ वादातून एका तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मित्रानेच मित्राला मारहाण केल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकी पार्किंगच्या किरकोळ वादातून आशिक खान याने २२ वर्षीय अश्विन नाडर याला मारहाण केली. सुरुवातीला दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला; मात्र काही वेळातच त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. उपस्थित नागरिकांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला, परंतु परिस्थिती नियंत्रणात आली नाही.
मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या अश्विन नाडर याला तातडीने सायन रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने प्रकरण अधिक चर्चेत आले आहे.
घटनेनंतर धारावी पोलिसांनी आरोपी आशिक खानविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला २३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांकडून घटनास्थळावरील पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असून साक्षीदारांचे जबाब नोंदवले जात आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून किरकोळ वादातून वाढणाऱ्या हिंसाचाराच्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी नागरिकांना वाद टाळण्याचे आणि कायद्याचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले आहे.


