मुंबई प्रतिनिधी
मुंबई : राज्याबाहेरील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मुंबई पोलीस दलातील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांची इतर राज्यांमध्ये निवडणूक कामासाठी नियुक्ती केली आहे. या निर्णयामुळे मुंबई पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. कायदा व सुव्यवस्था राखणे तसेच निष्पक्ष निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी या अधिकाऱ्यांवर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
मुंबई पोलीस दलातील गुन्हे शाखेचे सहआयुक्त लक्ष्मी गौतम, सहआयुक्त जय कुमार आणि गुप्तचर विभागाच्या प्रमुख डॉ. आरती सिंग यांची संवेदनशील राज्यांमध्ये बदली करण्यात आली आहे. एप्रिल महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतल्याचे समजते.
गुन्हे शाखेचे सहआयुक्त लक्ष्मी गौतम यांची आसाममध्ये नियुक्ती करण्यात आली असून ते १८ मार्च ते ९ एप्रिल या कालावधीत निवडणूक तयारीवर देखरेख ठेवणार आहेत. सहआयुक्त जय कुमार यांची पश्चिम बंगालमध्ये बदली करण्यात आली असून तेथील दोन टप्प्यांत होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते एप्रिल अखेरपर्यंत तेथे कार्यरत राहणार आहेत. गुप्तचर विभागाच्या प्रमुख डॉ. आरती सिंग यांची केरळमध्ये नियुक्ती करण्यात आली असून त्या तेथील सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष ठेवणार आहेत.
निवडणुकांच्या काळात इतर राज्यांतील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची परंपरा जुनी आहे. निवडणुकांसाठी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देणे तसेच स्थानिक दबावापासून दूर राहून निष्पक्ष निवडणूक प्रक्रिया पार पाडणे, या दोन प्रमुख कारणांसाठी अशा नियुक्त्या केल्या जातात.


