स्वप्नील गाडे | प्रतिनिधी
मुंबई : मुंबईतील बांद्रा-कुर्ला संकुल (बीकेसी) येथील पासपोर्ट कार्यालयाला ईमेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्याने बुधवारी एकच खळबळ उडाली. या ईमेलमध्ये सायनाइड गॅसच्या माध्यमातून स्फोट घडवून आणण्याचा उल्लेख करण्यात आल्याने पोलिस यंत्रणा तात्काळ सतर्क झाली.
धमकीची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसराचा ताबा घेतला. त्यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस) तसेच श्वानपथकाच्या मदतीने कार्यालय आणि परिसराची सखोल तपासणी करण्यात आली. क्राईम ब्रँचची टीमही तपासात सहभागी झाली असून सर्व बाबींची बारकाईने चौकशी सुरू आहे.
प्राथमिक तपासात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नसली, तरी खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. कार्यालय परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला असून येणाऱ्या-जाणाऱ्यांवर लक्ष ठेवले जात आहे.
दरम्यान, गुरुवारी गुढीपाडवा सण असल्याने या घटनेचे गांभीर्य अधिक वाढले आहे. सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात नागरिकांची वर्दळ वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिस आणि संबंधित तपास यंत्रणा अतिरिक्त सतर्क झाल्या आहेत.
हा धमकीचा ईमेल नेमका कुणी पाठवला, याचा शोध पोलिस घेत आहेत. तांत्रिक तपासाच्या माध्यमातून ईमेलचा उगम आणि त्यामागील व्यक्ती अथवा गट यांचा माग काढण्याचे काम सुरू असून, या प्रकरणाकडे सुरक्षा यंत्रणांचे बारकाईने लक्ष लागले आहे.


