मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील गजबजलेल्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) परिसरात वाहनचालकांना लक्ष्य करून पैशांची उकळपट्टी करण्याचा संशयास्पद प्रकार समोर आला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी महिला वाहनचालकांना लक्ष्य केलं जात असल्याचा दावा एका महिलेने सोशल मीडियावर केल्यानंतर बीकेसी पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत चौकशी सुरू केली आहे.
अनुपमा पटनाईक या महिलेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर आपला अनुभव शेअर करत वाहनचालकांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. तिच्या पोस्टनंतर हा प्रकार चर्चेत आला असून, परिसरात खरंच अशा प्रकारची टोळी सक्रिय आहे का याची पडताळणी पोलिसांकडून केली जात आहे.
काय आहे नेमका प्रकार?
मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार बीकेसीमधील Nita Mukesh Ambani Cultural Centre कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर घडत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
या कथित फसवणुकीत दुचाकीस्वार अचानक कारच्या समोर किंवा मागून येऊन धडक दिल्याचा बनाव करतात. त्यानंतर कारचालकावर अपघाताचा आरोप करत बाईकचे नुकसान झाल्याचे सांगितले जाते.
यानंतर पोलिसांकडे जाण्याऐवजी जागेवरच पैसे देण्याचा दबाव टाकला जातो. विशेष म्हणजे, रोख रक्कम घेण्याऐवजी आरोपी QR कोड दाखवून ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यास सांगतात. त्यामुळे व्यवहाराचा मागोवा घेणे कठीण व्हावे, असा या पद्धतीमागचा हेतू असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
सोशल मीडियावर महिलेचा इशारा
अनुपमा पटनाईक यांनी ‘X’ वर पोस्ट करत म्हटलं आहे की,“महिलांनी NMACC ते BKC परिसरात रात्री गाडी चालवताना विशेष काळजी घ्यावी. तिथे एक रॅकेट सक्रिय असल्याची शक्यता आहे. एक बाईकस्वार येऊन गाडीला धडक देतो आणि नंतर QR कोडद्वारे पैसे मागतो. त्या ठिकाणी अंधार आहे आणि सीसीटीव्ही कॅमेरेही कमी आहेत.”
त्यांनी पुढे वाहनचालकांना काही खबरदारीचे उपायही सुचवले आहेत. त्यानुसार,
कारमध्ये डॅश कॅम बसवावा
• अशा परिस्थितीत घाबरून पैसे देऊ नयेत
• तात्काळ 100 किंवा 112 या आपत्कालीन क्रमांकांवर संपर्क साधावा
• पोलिस आल्याशिवाय वाहनातून खाली उतरू नये
पोलिसांचे म्हणणे काय?
या प्रकरणावर बीकेसी पोलिसांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, सोशल मीडियावरील पोस्टची दखल घेतली आहे. संबंधित महिलेशी संपर्क साधण्यात आला असून तिला अधिक माहिती देण्यासाठी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले आहे.
पोलिसांनी स्पष्ट केले की, अलीकडे परिसरात घडलेल्या एका अपघाताच्या घटनेत कारने अचानक वळण घेतल्याने एक बाईकस्वार पडला होता. त्याला उपचारासाठी Bhabha Hospital येथे दाखल करण्यात आले असून त्या प्रकरणाची कायदेशीर नोंद झाली आहे.
मात्र, सध्या तरी बीकेसी परिसरात फसवणूक करणारी टोळी सक्रिय असल्याचे ठोस पुरावे समोर आलेले नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
प्रत्यक्षदर्शींचे काय म्हणणे?
परिसरातील एका हॉटेल कर्मचाऱ्याने सांगितले की, “आम्ही सकाळी १० ते रात्री २ वाजेपर्यंत येथे काम करतो. मात्र आमच्या नजरेस असा कोणताही प्रकार पडलेला नाही. कदाचित अंधाऱ्या ठिकाणी अशा घटना घडत असाव्यात.”
या प्रकरणाबाबत अधिक तपशील समोर येत असून एका इंग्रजी दैनिकानेही यावर सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले आहे.
वाहनचालकांनी काय काळजी घ्यावी?
तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारच्या फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी वाहनचालकांनी खालील बाबी लक्षात ठेवणे आवश्यक आहे
• अपघात झाल्याचा आरोप झाला तरी घाबरून पैसे देऊ नयेत
• शक्य असल्यास घटनेचा व्हिडिओ किंवा फोटो काढावा
• तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी
• डॅश कॅम बसवणे हा सुरक्षिततेचा प्रभावी उपाय ठरू शकतो
मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात नवीन प्रकारच्या फसवणुकीचे प्रकार समोर येत असल्याने वाहनचालकांनी सतर्क राहणे गरजेचे असल्याचे पोलिसांकडूनही सांगितले जात आहे.


