मुंबई प्रतिनिधी
म्हाडाच्या गिरणी कामगारांसाठी असलेली खोली मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका व्यक्तीची तब्बल ३७ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी एका भामट्याला अटक केली आहे. रुपेश सावंत (वय ४१) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो कोकणातील एका बड्या राजकीय नेत्याचा जवळचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणामुळे मुंबईतील घरांच्या व्यवहारात सुरू असलेल्या फसवणुकीच्या प्रकारांबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार दीपक पेडणेकर हे स्वतःसाठी घर शोधत होते. त्यावेळी त्यांच्या ओळखीतील कानडे नावाच्या व्यक्तीने त्यांची ओळख रुपेश सावंत याच्याशी करून दिली. सावंतने स्वतःला म्हाडाच्या गिरणी कामगारांच्या घरांच्या व्यवहारात ओळखी असल्याचे सांगत पेडणेकर यांचा विश्वास संपादन केला.
सावंतने पेडणेकर यांना म्हाडाच्या गिरणी कामगारांसाठी असलेली एक खोली ३९ लाख रुपयांत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पेडणेकर यांनी टप्प्याटप्प्याने सावंतकडे पैसे देण्यास सुरुवात केली. काही महिन्यांच्या कालावधीत त्यांनी सावंतला एकूण ४० लाख ४० हजार रुपये दिल्याची माहिती समोर आली आहे.
मात्र नंतर धक्कादायक बाब समोर आली. ज्या व्यक्तीच्या नावावर ती खोली होती त्या श्रीपाद गुडाळकर यांच्याकडे सावंतने एक रुपयाही जमा केलेला नव्हता. एवढेच नव्हे तर तीच खोली सावंतने दुसऱ्या व्यक्तीला विकल्याचेही पुढे उघड झाले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पेडणेकर यांनी सावंतकडे वारंवार पैसे परत मागितले. मात्र पैसे परत देण्याऐवजी सावंतने त्यांना धमक्या देण्यास सुरुवात केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. अखेर पेडणेकर यांनी काळाचौकी पोलीस ठाण्यात धाव घेत सावंतविरोधात तक्रार दाखल केली.
तक्रारीच्या आधारे पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. प्राथमिक तपासानंतर आरोपी रुपेश सावंत याला अटक करण्यात आली. पोलिसांकडून त्याची कसून चौकशी सुरू असून या प्रकरणात आणखी काही लोकांचा सहभाग आहे का, याचाही तपास केला जात आहे.
दरम्यान, आरोपी सावंत हा कोकणातील एका प्रभावशाली राजकीय नेत्याचा निकटवर्तीय कार्यकर्ता असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय वर्तुळातही वेगळे महत्त्व प्राप्त झाले असून पोलिसांच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


