मुंबई प्रतिनिधी
मुंबई : मुंबई महापालिकेच्या महापौर रितू तावडे यांच्या नव्या वाहनावर लाल व निळे लुकलुकणारे दिवे बसवण्यात आल्याने समाजमाध्यमांवर आणि राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. केंद्र सरकारने २०१७ मध्ये सामान्य सरकारी वाहनांवर लाल दिवा वापरण्यास बंदी घातलेली असतानाही महापौरांच्या वाहनावर असे दिवे दिसल्याने नियमभंग झाल्याचा आरोप होत होता. मात्र या प्रकरणाची दखल घेत बृहन्मुंबई महानगरपालिकेने संबंधित वाहनांवरील फ्लॅशर दिवे काढून टाकल्याचे स्पष्ट केले आहे.
पालिकेच्या जनसंपर्क विभागाने आज रविवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात सांगितले की, पदाधिकाऱ्यांचे पदग्रहण झाल्यानंतर त्यांना अधिकृत वाहने उपलब्ध करून दिली जातात. या वाहनांवर लुकलुकणारे दिवे बसवण्यात आल्याची बाब माध्यमांतून समोर आल्यानंतर तातडीने त्याची दखल घेण्यात आली. त्यानुसार महापौरांसह पदाधिकाऱ्यांच्या वाहनांवरील फ्लॅशर दिवे काढून टाकण्यात आले असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
महापौरांच्या वाहनावर छतावर नव्हे तर पुढील भागात लाल आणि निळ्या रंगाचे दिवे बसवण्यात आल्याचे छायाचित्र समाजमाध्यमांवर व्हायरल झाले होते. तसेच त्यांच्या ताफ्यात पोलिसांच्या वाहनासारखी लाल-निळ्या दिव्यांची स्कॉर्पिओ गाडी दिसल्याने व्हीआयपी संस्कृती पुन्हा सुरू झाल्याची टीकाही होत होती.
केंद्र सरकारने १ मे २०१७ रोजी प्रसिद्ध केलेल्या राजपत्र अधिसूचनेनुसार सामान्य सरकारी वाहनांवर लाल दिवा, ध्वज, नावफलक किंवा अधिकार दर्शवणारी चिन्हे लावण्यास बंदी घातली आहे. अग्निशमन दल, पोलीस, संरक्षण दल, अर्धसैनिक दल तसेच आपत्ती व्यवस्थापन सेवांच्या वाहनांनाच विशेष परिस्थितीत रंगीत दिवे वापरण्याची परवानगी आहे. वाहन अधिकृत कामावर नसताना अशा दिव्यांचा वापर करणे बेकायदेशीर मानले जाते.
दरम्यान, अलीकडेच महापालिकेने पदाधिकाऱ्यांसाठी नव्या वाहनांची खरेदी केली आहे. परिवहन विभागामार्फत महापौर, उपमहापौर आणि विविध समित्यांच्या अध्यक्षांसाठी एकूण १३ वाहने घेण्यात आली आहेत. महापौरांसाठी इनोव्हा वाहन तर उपमहापौर आणि वैधानिक तसेच विशेष समित्यांच्या अध्यक्षांसाठी स्कॉर्पिओ वाहने देण्यात आली आहेत.
या खरेदीमध्ये इनोव्हा वाहनासाठी सुमारे ३० लाख रुपये, तर प्रत्येक स्कॉर्पिओसाठी सुमारे १८ लाख रुपये खर्च करण्यात आले असून एकूण खर्च अंदाजे २ कोटी १६ लाख रुपये आहे. प्रभाग समिती अध्यक्षांसाठी मात्र भाडेतत्त्वावर वाहने उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती पालिकेने दिली.


