नवी मुंबई प्रतिनिधी
सट्टा बाजारात गुंतवणुकीवर भरघोस परताव्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या महापे येथील बोगस कॉल सेंटरवर आर्थिक गुप्तवार्ता पथक आणि सायबर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत छापा टाकला. या कारवाईत दोन जणांना अटक करण्यात आली असून १ कोटी २ लाख ५८ हजार ८१८ रुपयांची फसवणूक झाल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. या रकमेचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीतील महापे परिसरात अनेक कॉल सेंटर कार्यरत आहेत. मात्र या गर्दीत काही बोगस कॉल सेंटरद्वारे देशभरातील नागरिकांना सट्टा बाजारातील गुंतवणुकीवर मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यापूर्वी अशा तीन कॉल सेंटरवर कारवाई करून त्यांचा पर्दाफाश करण्यात आला होता.
दरम्यान, आर्थिक गुप्तवार्ता पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज गोरे आणि गुन्हे शाखेच्या कक्ष-१ मधील पोलीस उपनिरीक्षक अभय काकड यांना गुप्त बातमीदारामार्फत महापे येथील एका कॉल सेंटरमधून पुन्हा फसवणुकीचा कारभार सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार आर्थिक गुप्तवार्ता पथक आणि सायबर पोलिसांची स्वतंत्र तपास पथके तयार करून बुधवारी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टेक्नो सिटी, ग्रीन स्केप इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरील कार्यालयावर छापा टाकण्यात आला.
या ठिकाणी ‘डीजी शेअर मार्केट रिसर्च’ या नावाने कंपनी कार्यरत असल्याचे आढळले. कार्यालयात २२ युवक-युवती संगणकांवरून तयार करण्यात आलेल्या व्हॉट्सअॅप गटांद्वारे आणि कॉलच्या माध्यमातून ग्राहकांशी संपर्क साधत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. तपासात संगणकांमधून इंट्राडे आणि इक्विटी ट्रेडिंग संदर्भातील कॉल सेंटरचे काम सुरू असल्याचे स्पष्ट झाले.
कंपनीच्या मोबाईल क्रमांकावरून नागरिकांना शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास जास्त परतावा मिळेल, असे आश्वासन देत त्यांच्याकडून रक्कम जमा करण्यासाठी विविध बँक खात्यांची माहिती पाठवली जात होती. या पद्धतीने कंपनीच्या खात्यासह इतर १८ बँक खात्यांमध्ये पेमेंट लिंकद्वारे पैसे स्वीकारण्यात येत असल्याचे तपासात समोर आले.
या व्यवहारांमधून एकूण १ कोटी २ लाख ५८ हजार ८१८ रुपयांची फसवणूक झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून फसवणुकीची रक्कम वाढण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कॉल सेंटरमधून जप्त करण्यात आलेल्या बँक खात्यांची भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने विकसित केलेल्या राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंद पोर्टलवर (एनसीसीआरपी) तपासणी केली असता देशभरातून सायबर फसवणुकीच्या पाच तक्रारी नोंद झाल्याचे उघड झाले.
या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून शिवम विनोदकुमार दुबे आणि सुजित मसिचरण वाल्मिकी यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने दोघांना १५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर सुरज दुबे या तिसऱ्या संशयिताचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


