विरार प्रतिनिधी
वसई : वसई-विरार शहरात सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान (एआरटी) कायद्याचे उल्लंघन करून डोनर शुक्राणूंची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या रॅकेटचा महापालिकेच्या वैद्यकीय पथकाने पर्दाफाश केला. विरार पूर्व येथील एका खाजगी कंपनीवर छापा टाकून ४५ डोनर स्पर्म व्हायल्स जप्त करण्यात आल्या असून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाला विरार पूर्वेतील एन. पी. रस्त्यावरील पद्मीबाई टॉवरमधील ‘जिवदानी सायंटिफिक कंपनी’ येथे बेकायदेशीर डोनर गॅमेट्सची विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. भक्ती चौधरी यांच्या पथकाने ९ मार्च रोजी छापा टाकला.
झडतीदरम्यान ‘क्रायोसील क्रायोजेनिक कंटेनर’मध्ये साठवून ठेवलेल्या एकूण ४५ ‘आर्टिफिशियल इन्सेमिनेशन डोनर स्पर्म व्हायल्स’ आढळून आल्या. संबंधित एजन्सी मयूर भागवत संखे व कमलेश शंकर खुत यांच्या मालकीची असल्याचे तपासात स्पष्ट झाले.
चौकशीत डॉक्टर, रुग्णालये किंवा एजंटांकडून मागणी आल्यानंतर आरोपी एजन्सीमार्फत डोनर स्पर्मचे नमुने पुरवत असल्याचे उघड झाले. ही संस्था ‘सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान (नियमन) अधिनियम २०२१’ अंतर्गत एआरटी बँक म्हणून नोंदणीकृत नसल्याचेही आढळले.
याप्रकरणी महापालिकेच्या तक्रारीवरून विरार पोलीस ठाण्यात मयूर संखे व कमलेश खुत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.


