नागपूर प्रतिनिधी
राज्यात उन्हाचा पारा दिवसेंदिवस चढत असून मार्च महिन्यातच कडाक्याच्या उष्णतेने नागरिक हैराण झाले आहेत. राज्यातील अनेक शहरांमध्ये तापमानात लक्षणीय वाढ झाली असून उकाड्यामुळे सर्वसामान्यांची अक्षरशः लाही-लाही होत आहे. मुंबई, ठाणे, पालघर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार यांसह विविध जिल्ह्यांमध्ये उन्हाची तीव्रता वाढल्याचे चित्र आहे.
विदर्भातही अशीच परिस्थिती असून गुरुवारी अमरावती येथे देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. गुरुवारी अमरावती येथे तब्बल ४२.२ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले, तर अकोला येथे ४२ अंश तापमानाची नोंद झाली. त्यामुळे अमरावती हे देशातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले असून जगभरातील उष्ण शहरांच्या यादीत ते १५व्या क्रमांकावर असल्याची नोंद झाली आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार अमरावती आणि अकोला या दोन्ही शहरांमध्ये तापमान सरासरीपेक्षा अनुक्रमे ६.८ आणि ५.३ अंशांनी अधिक नोंदविले गेले. त्यामुळे या भागात उष्णतेची लाट (हीटवेव्ह) असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानाने चाळिशी पार केल्याने एप्रिल आणि मे महिन्यात उष्णतेची तीव्रता किती वाढेल, याबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
दरम्यान, विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्येही तापमानात मोठी वाढ झाली आहे. ब्रह्मपुरी येथे ४०.८ अंश, चंद्रपूर आणि वर्धा येथे प्रत्येकी ४०.२ अंश, तर यवतमाळ येथे ४० अंश इतके तापमान नोंदविण्यात आले. नागपूर येथे कमाल तापमान ३९ अंश होते. एकूणच विदर्भातील ११ पैकी निम्म्याहून अधिक जिल्ह्यांमध्ये तापमान ४० अंशांच्या पुढे गेले आहे.
भंडारा आणि गोंदिया येथे तुलनेने कमी म्हणजे ३८ अंश इतके तापमान नोंदले गेले असले तरी बहुतांश ठिकाणी तापमान सरासरीपेक्षा ३ ते ५ अंशांनी अधिक असल्याने उष्णतेचा चटका नागरिकांना जाणवू लागला आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस झालेल्या अवकाळी पावसामुळे काही दिवस गारवा जाणवत होता; मात्र मार्च सुरू होताच वातावरण कोरडे झाले आणि उष्णतेची तीव्रता वाढली आहे.
विदर्भात वादळी पावसाचा अंदाज
दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवसांत विदर्भात वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
तसेच शनिवार ते सोमवार या कालावधीत विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून नागपूरचाही त्यात समावेश आहे. या पावसामुळे पुढील काही दिवसांत तापमानात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
अचानक वाढलेल्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दुपारच्या वेळी उन्हात बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी पिणे आणि उष्णतेपासून बचावासाठी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.


