नागपूर प्रतिनिधी
राज्याच्या राजकारणात लवकरच मोठे उलथापालथीचे चित्र पाहायला मिळेल, असा खळबळजनक दावा महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारी नागपूरमध्ये केला. “भाजपचा इतिहास पाहिला तर त्यांनी नेहमीच मित्रपक्षांना संपवण्याचे राजकारण केले आहे. सध्या महाराष्ट्रातही त्याच पद्धतीचा डाव सुरू असून येत्या आठ दिवसांत राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होईल,” असे सूचक विधान करत पटोले यांनी सत्ताधारी आघाडीवर निशाणा साधला.
नागपूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना पटोले यांनी भाजपवर ‘मित्रपक्षांना गिळंकृत करणारा पक्ष’ असल्याचा आरोप केला. त्यांनी देशातील राजकीय घडामोडींचा दाखला देत, “भाजप ज्या ज्या राज्यांत सत्तेत आला, तिथे त्याने मित्रपक्षांची ताकद कमी केली किंवा त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रातही त्याच प्रकारची राजकीय रणनीती सुरू आहे,” असा दावा केला.
‘ऑपरेशन लोटस’ पूर्णत्वाकडे?
राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय चर्चांबाबत बोलताना पटोले म्हणाले की, पाच राज्यांच्या निवडणूक निकालांपूर्वीच महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’ पूर्णत्वास जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भात काही दिवसांपूर्वी अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनीही मोठा दावा केला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही मोठे नेते आणि आमदार भाजपच्या संपर्कात आहेत.
या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पटोले म्हणाले, “मित्रपक्षांना संपवणे हा भाजपचा जुना इतिहास आहे. भाजप हा इतर पक्षांना गिळंकृत करणारा पक्ष आहे. देशभरातील अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. त्यामुळे भविष्यात शिंदे गटाची शिवसेना किंवा अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस यांचे काय होईल, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. त्यांच्या काही नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर त्यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.”
‘राज्यात शेवटी दोनच पक्ष राहतील’
राज्याच्या राजकीय भवितव्याबाबत बोलताना पटोले यांनी मोठे विधान केले. “जर ही परिस्थिती कायम राहिली तर पुढील काळात महाराष्ट्रात केवळ दोनच मोठे पक्ष उरतील – भाजप आणि काँग्रेस. बाकीचे पक्ष भाजपमध्ये विलीन होतील किंवा त्यांची ताकद कमी होईल,” असे ते म्हणाले.
त्यांच्या मते, सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकीय हालचाली या त्या दिशेनेच जात असल्याचे दिसत आहे. “मी आधीही सांगितले होते की भाजप एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षाचा राजकीय ‘गेम’ करणार आहे. अजून मोठा खेळ बाकी आहे. फक्त आठ दिवस थांबा, सगळं स्पष्ट दिसेल,” असे सांगत पटोले यांनी राजकीय घडामोडींविषयी उत्सुकता वाढवली.
जनतेचा भाजपवरील विश्वास कमी – पटोले
राज्यातील जनतेचा सत्ताधाऱ्यांवरील विश्वास कमी होत असल्याचा आरोप करत पटोले म्हणाले, “महाराष्ट्रातील जनता भाजपच्या या राजकीय खेळाला कंटाळली आहे. जनतेला पुन्हा काँग्रेसची सत्ता पाहायची आहे. जर निवडणुका पारदर्शक पद्धतीने, विशेषतः बॅलेट पेपरवर घेण्यात आल्या तर जनता भाजपला त्यांची खरी जागा दाखवून देईल.”
अशोक खरात प्रकरणावरून सरकारवर टीका
दरम्यान, राज्यात गाजत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरही पटोले यांनी सरकारवर जोरदार टीका केली. “अशोक खरात हा सत्ताधाऱ्यांनीच पोसलेला व्यक्ती आहे. त्याच्या आश्रमात अनेक बडे नेते आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची ये-जा होती. त्यामुळे सरकार आणि गृहमंत्रालयाला त्याच्या कारवायांची माहिती नव्हती, असे म्हणणे पटण्यासारखे नाही,” असे ते म्हणाले.
पटोले यांनी आरोप केला की, सरकारने दीर्घकाळ या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले. “सत्ताधाऱ्यांनीच त्याला पाठीशी घातले. मात्र आता हे प्रकरण मोठे होत असल्यामुळे सरकारची कोंडी झाली आहे,” असे त्यांनी नमूद केले.
राजकीय चर्चांना उधाण
नाना पटोले यांच्या या विधानांमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. येत्या काही दिवसांत राज्यात खरोखरच मोठ्या राजकीय हालचाली घडणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सत्ताधारी आघाडीकडून यावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी पटोले यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.


