जळगाव प्रतिनिधी
जळगाव : नशिराबाद येथील हॉटेल व्यावसायिक प्रमोद पुरुषोत्तम पाटील यांनी हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी दोन सहकाऱ्यांकडून होत असलेल्या मानसिक त्रासाचा उल्लेख केल्याची माहिती समोर आली आहे.

प्रमोद पाटील यांनी परेश सुभाष पाटील यांच्यासोबत भागीदारीतून ‘हॉटेल आस्वाद’ सुरू केले होते. मात्र काही कारणांमुळे हे हॉटेल मागील काही दिवसांपासून बंद होते. संबंधित हॉटेल ज्या शेतजमिनीवर सुरू होते ती जमीन परेश सुभाष पाटील व सुभाष यशवंत पाटील यांच्या मालकीची असल्याने त्यांनी अचानक हॉटेल खाली करण्यास सांगितल्याचे सांगितले जात आहे. त्याबदल्यात कोणताही मोबदला देण्यास ते तयार नसल्याने प्रमोद पाटील मानसिक तणावात होते, असे त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केल्याची माहिती आहे.
या मानसिक तणावातूनच त्यांनी हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणातील संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मृतदेह नशिराबाद पोलीस ठाण्यात आणण्यात आला होता. पोलिसांनी योग्य तपास करून न्याय दिला जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतरही या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झालेली नव्हती. त्यामुळे मृत प्रमोद पाटील यांच्या नातेवाईकांनी मृतदेह पोलीस ठाण्यात आणत त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीच्या आधारे संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी काही काळ पोलीस ठाण्याबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी नशिराबाद पोलीस अधिक तपास करत आहेत.


