नागपूर प्रतिनिधी
होळीच्या रंगांच्या उत्सवाला नागपूर जिल्ह्यातील कोराडी परिसरात अत्यंत धक्कादायक गालबोट लागले. पिचकारीने पाणी मारल्याच्या किरकोळ कारणावरून आजीने चार वर्षांच्या नातवावर उकळते पाणी ओतल्याची संतापजनक घटना घडली असून यात मुलगा सुमारे ४५ टक्के भाजला आहे. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
Heartbreaking incident getting viral a Grandmother scalds 5-year-old in Nagpur after Holi request; child recovering from burns. pic.twitter.com/zK2g9wOp3Z
— Krishna1 (@KrishnaBhojwan5) March 4, 2026
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओम हरीश वांगे (वय ४) असे जखमी मुलाचे नाव आहे. कोराडीतील आरामशीन परिसरातील वॉर्ड क्रमांक २ मध्ये सोमवारी (३ मार्च) ही घटना घडली. ओम घराबाहेर रंगाने भरलेल्या स्प्रे बाटलीने खेळत होता. खेळता खेळता त्याने चुकून त्याची आजी सिंधू ठाकरे यांच्या अंगावर पिचकारीने पाणी मारले.
या प्रकाराचा राग आल्याने सिंधू ठाकरे यांनी होळीच्या लाकडावर गरम केलेले बादलीभर उकळते पाणी ओमच्या अंगावर ओतल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर मुलगा वेदनेने ओरडत दूर पळाल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येते.
या घटनेत ओमच्या कंबरेखालच्या भागाला गंभीर भाजल्या गेल्याने त्याला तातडीने नागपूरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या प्राथमिक अंदाजानुसार तो सुमारे ४५ टक्के भाजला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. त्यामध्ये काळ्या साडीत असलेली महिला पाण्याने भरलेली बादली घेऊन येताना दिसते. मुलगा तिच्यावर रंग फवारण्याचा प्रयत्न करताच ती त्याच्यावर पाणी ओतताना दिसते. त्यानंतर दुसरी महिला थंड पाण्याची बादली आणून मुलाच्या अंगावर पाणी टाकताना दिसते. काही क्षणांनी आजीही जखमांवर थंड पाणी टाकण्याचा प्रयत्न करताना दिसते.
धुळवडीदरम्यान किरकोळ जखमींच्या घटना
दरम्यान, धुळवडीच्या दिवशी राज्यात अनेक ठिकाणी किरकोळ अपघात आणि मारहाणीच्या घटना घडल्या. मुंबईत रंग खेळताना ४५ जण जखमी झाल्याची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी ही संख्या ९३ होती. यंदा नैसर्गिक रंगांचा वापर वाढल्याने गंभीर दुखापतींच्या घटना तुलनेने कमी झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.


