मुंबई प्रतिनिधी
दक्षिण मुंबईतील आग्रीपाडा परिसरात एका पोर्तुगालच्या महिलेचा पाठलाग करून तिची छेडछाड केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, मुख्य आरोपीला बिहारमधून ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेमुळे परदेशी नागरिकांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
२२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. संबंधित महिला महालक्ष्मी रेल्वे स्थानक, धोबी घाट आणि सातरस्ता परिसरातून जात असताना दोन तरुणांनी तिचा पाठलाग करत अश्लील हावभाव व छेडछाड केल्याचा आरोप आहे. या प्रकाराचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला होता. २७ फेब्रुवारी रोजी हा व्हिडिओ पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर तपासाला वेग देण्यात आला.
या प्रकरणी मनसुखकुमार चंदकिशोर शर्मा (२२) आणि गुलशनकुमार नरेश शर्मा (२०) अशी आरोपींची नावे असून, दोघेही मूळचे बिहारचे रहिवासी आहेत. पोलिसांनी तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक चौकशीच्या आधारे गुलशनकुमार याला २८ फेब्रुवारी रोजी मलबार हिल येथील एका बांधकाम साईटवरून ताब्यात घेतले. न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला ४ मार्च २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, मुख्य आरोपी मनसुखकुमार हा होळी साजरी करण्यासाठी बिहारकडे रवाना झाला होता. त्याचा माग काढत पोलिसांच्या पथकाने १ मार्च रोजी बिहारमधून त्याला अटक केली. दोन्ही आरोपींविरुद्ध आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
विदेशी नागरिकांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी भूमिका पोलिसांनी स्पष्ट केली आहे.


