बीड प्रतिनिधी
राज्यात होळी व धुळवडीचा सण उत्साहात साजरा होत असताना विविध भागांतील आगळ्या-वेगळ्या परंपरा पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. विडा (ता. केज) येथे धुळवडीच्या दिवशी घरजावयाची गाढवावरून मिरवणूक काढण्याची तब्बल ९० वर्षांची परंपरा यंदाही दणक्यात पार पडली. ‘गर्दभ स्वारी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या उपक्रमात ढोल-ताशांचा गजर, डीजेचा दणदणाट आणि रंगांची उधळण यांतून जावयाचा अनोखा ‘सन्मान’ करण्यात आला.
सासरवाडीत जावयाचा मान, सत्कार आणि राजासारखी वागणूक ही सर्वत्र रूढ असलेली परंपरा; मात्र विडा गावात धुळवडीच्या दिवशी हा सन्मान वेगळ्याच पद्धतीने व्यक्त केला जातो. गावकरी दोन दिवस आधीपासून ‘जावयाच्या शोधमोहीमे’ला सुरुवात करतात. धुळवडीच्या दिवशी जावयाला गाठून गाढवावर बसवले जाते आणि वाजत-गाजत संपूर्ण गावातून मिरवणूक काढली जाते.
यंदा शिवाजी गालफाडे (रा. जाधवजवळा) यांची गर्दभ स्वारी काढण्यात आली. गेली साठ वर्षे गावकऱ्यांना चकवा देत स्वारी टाळणारे गालफाडे यांना अखेर तरुणांनी गाठले. घरातच थांबून राहण्याचा त्यांचा प्रयत्न फोल ठरला. ढोल-ताशांच्या गजरात, रंगांच्या उधळणीत त्यांना गाढवावर बसवून गावभर फिरवण्यात आले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही जावयाला शोधण्यासाठी गावातील तरुणांची तीन पथके नियुक्त करण्यात आली होती. काही जावई उसाच्या शेतात लपले, तर काहींनी गाव सोडण्याचाही प्रयत्न केला. जावयाला पकडण्याच्या ‘मोहीमे’दरम्यान किरकोळ चढाओढीत गावचे सरपंच जखमी झाल्याचीही नोंद आहे. अखेर गालफाडे यांना तयार करून मिरवणूक काढण्यात आली आणि गावकऱ्यांनी जल्लोष केला.
थट्टा, मस्करी आणि आपुलकीतून जपली जाणारी ही परंपरा गावाच्या सांस्कृतिक वैशिष्ट्याचा भाग बनली आहे. बदलत्या काळात अनेक रूढी लोप पावत असताना विडा गावातील गर्दभ स्वारीची परंपरा मात्र तितक्याच उत्साहात टिकून आहे. धुळवडीच्या रंगोत्सवात जावयाच्या या ‘अनोख्या सन्माना’ने परिसरात कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले आहे.


