मुंबई प्रतिनिधी
मध्यपूर्वेत उफाळलेल्या अमेरिका–इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक विस्कळीत झाली असून, भारतातून आखाती देशांकडे होणारी नाशवंत कृषीमाल निर्यात ठप्प झाली आहे. या अचानक खंडित झालेल्या पुरवठा साखळीचा थेट फटका भारतीय शेतकरी आणि निर्यातदारांना बसला असून, अवघ्या २४ तासांत सुमारे २,००० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
भारतामधून संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, कुवेत, कतार, बहरीन, इराक, जॉर्डन, इराण तसेच इस्रायल या देशांकडे मोठ्या प्रमाणावर ताज्या फळे, भाजीपाला आणि इतर कृषी उत्पादनांची हवाई मार्गे निर्यात होते. संघर्षामुळे आखाती हवाई क्षेत्रात उड्डाणांवर निर्बंध आल्याने ही निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. समुद्री मार्गाने काही प्रमाणात व्यापार सुरू असला, तरी संघर्ष दीर्घकाळ चालल्यास जहाजवाहतुकीवरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
गत आर्थिक वर्षात आखाती देशांबरोबर भारताची सुमारे २,००८ कोटी रुपयांची कृषी निर्यात आणि सुमारे ६,६७० कोटी रुपयांची आयात झाली होती. चालू वर्षातही हा व्यापार सुरळीत सुरू असताना युद्धजन्य परिस्थितीमुळे अचानक व्यत्यय निर्माण झाला. विशेषतः अल्प शेल्फ-लाईफ असलेल्या द्राक्षे, डाळिंब, भाजीपाला आणि फुलांच्या निर्यातीवर तातडीचा परिणाम झाला आहे.
दरम्यान, पुढील पंधरवड्यात अपेक्षित असलेली खजूर आयातही संकटात सापडण्याची चिन्हे आहेत. सध्या रमजान महिन्यात खजूराची मागणी उच्चांकी असते. आयात घटल्यास बाजारभाव वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
बाजार समितीचे संचालक संजय पानसरे यांनी सांगितले, ‘‘आखाती देशांमध्ये भारतातून दररोज मोठ्या प्रमाणावर फळे व भाजीपाला जातो. हवाई वाहतूक पूर्ववत न झाल्यास केवळ निर्यातदार नव्हे, तर शेतकऱ्यांच्या उत्पन्नावरही मोठा परिणाम होईल.’’
विशेषतः आंबा हंगाम तोंडावर असताना निर्यात व्यवस्थेत अडथळे कायम राहिल्यास परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पर्यायी वाहतूक मार्ग, शीतसाखळी साठवणूक व जलद सीमाशुल्क प्रक्रिया यांसाठी केंद्र सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निर्यातदार संघटनांनी केली आहे.


