सातारा प्रतिनिधी
फलटण येथील यशवंत सहकारी बँकेतील सुमारे ११२ कोटी रुपयांच्या कथित कर्ज घोटाळ्याप्रकरणी भाजपचे नेते व महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांना बुधवारी पहाटे अटक करण्यात आली. कराड येथील न्यायालयाने त्यांना २ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने पहाटे चरेगांवकर यांच्या निवासस्थानी धाड टाकून त्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी चरेगांवकर यांच्यासह बँकेचे संचालक, अधिकारी आणि संबंधित नातेवाईक अशा सुमारे ५० जणांविरुद्ध कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
तपासातील प्राथमिक माहितीनुसार, २०१४ ते २०२५ या कालावधीत बँकेत १९५ बोगस कर्जखाती उघडून कोट्यवधी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आल्याचा आरोप आहे. कोणतेही तारण न घेता आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज मंजूर करून बँकेची फसवणूक केल्याचा ठपका तपास यंत्रणांनी ठेवला आहे.
घोटाळ्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. यापूर्वी डिसेंबर २०२५ मध्ये अंमलबजावणी संचालनालय (ईडी) ने बँकेच्या शाखांसह चरेगांवकर यांच्या नातेवाईकांच्या निवासस्थानी छापे टाकले होते. अटक टाळण्यासाठी चरेगांवकर यांनी न्यायालयात धाव घेतली होती; मात्र अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता.
बुधवारी त्यांना कराड येथील पहिले अतिरिक्त सत्र न्यायाधीश यु. एल. जोशी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता पुष्पा जाधव यांनी, गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाल्याने व घोटाळ्याचा व्याप तपासण्यासाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे न्यायालयात नमूद केले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने २ मार्चपर्यंत पोलीस कोठडीचा आदेश दिला.
या अटकेमुळे सातारा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात तसेच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.


