सातारा प्रतिनिधी
शहरातील वाढती प्रवासी संख्या, वाहतुकीचा वाढता ताण आणि सुरक्षिततेच्या गरजा लक्षात घेऊन साताऱ्यातील मध्यवर्ती बसस्थानकाचे सर्वंकष आधुनिकीकरण करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. जुन्या बसस्थानकाच्या जागेवर आधुनिक, सुसज्ज आणि प्रवासी-केंद्रित बसस्थानक उभारण्याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांच्यात मंत्रालयात झालेल्या संयुक्त आढावा बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. पुनर्बांधणी व विस्ताराच्या कामास गती देण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले.
बैठकीस परिवहन विभाग, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रस्तावित आराखड्याचे सादरीकरण करताना जुन्या बसस्थानकाच्या जागेवर बहुउद्देशीय, सुटसुटीत आणि सुरक्षित बसस्थानक उभारण्याचा आराखडा मांडण्यात आला. शहराच्या वाढत्या विस्तारामुळे भविष्यातील वाहतुकीची गरज लक्षात घेऊन नियोजनबद्ध पुनर्बांधणी अपरिहार्य असल्याचे भोसले यांनी नमूद केले; त्यास सरनाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने पुढील कार्यवाहीचे निर्देश दिले.
प्रस्तावित आराखड्यात बसस्थानकातील ‘इन’ व ‘आउट’ गेट एकाच मार्गावर ठेवण्याच्या कल्पनेचा पुनर्विचार करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी स्वतंत्र प्रवेश व निर्गमन मार्ग ठेवण्यावर भर देण्यात आला. बसस्थानक परिसरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण, सुलभ वाहतूक व्यवस्थापन, प्रवासी व नागरिकांसाठी आवश्यक नागरी सुविधा उभारणी याबाबतही सूचना करण्यात आल्या. अद्ययावत प्रतीक्षागृह, स्वच्छतागृहे, दिव्यांगांसाठी सुलभ सुविधा, वाहनतळ व्यवस्था आणि आधुनिक सुरक्षा यंत्रणा उभारण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला.
पुनर्बांधणीसाठी आवश्यक निधी उपलब्धतेबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली असून काम गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. या प्रकल्पामुळे प्रवाशांना सुरक्षित, सुसंगत आणि आधुनिक सुविधा उपलब्ध होण्याबरोबरच शहराच्या वाहतूक व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होईल, असा विश्वास भोसले यांनी व्यक्त केला. सातारा शहराच्या वाढत्या नागरी गरजांशी सुसंगत पायाभूत सुविधा उभारण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.


