मुंबई प्रतिनिधी
वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना परवडणाऱ्या आरोग्य सेवांचा अभाव प्रकर्षाने जाणवत असताना ‘डॉ. अदिती मेडिकल अॅण्ड सोशल वेल्फेअर फाउंडेशन’च्या वतीने आयोजित मोफत नेत्रतपासणी व सवलतीत चष्मा वाटप शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. खेरवाडी येथील तालुका काँग्रेस कार्यालयात २१ व २२ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या या दोन दिवसीय शिबिरात ४५० हून अधिक नागरिकांची नेत्रतपासणी करण्यात आली.
सध्या बाजारात चष्म्यांच्या किमतीत मोठी वाढ झाली असून साधा नंबरचा चष्मा १२०० ते १४०० रुपयांपर्यंत मिळत असल्याने तो आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या आवाक्याबाहेर जात आहे. ही बाब लक्षात घेऊन फाउंडेशनने त्याच दर्जाचे चष्मे अवघ्या २५० ते ३०० रुपयांत उपलब्ध करून दिले. शिबिरात तपासणी करून घेतलेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे २०० जणांनी सवलतीच्या दरातील चष्म्यांचा लाभ घेतला.
तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने लाभार्थ्यांची डोळ्यांची सखोल तपासणी करून योग्य नंबरचे चष्मे सुचविले तसेच डोळ्यांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन केले. ज्येष्ठ नागरिक, महिला व कामगारवर्गीय नागरिकांनी या उपक्रमाचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतल्याचे आयोजकांनी सांगितले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी काँग्रेसचे पदाधिकारी मुन्नी दायमा, राधेश्याम चव्हाण, चंद्रभान चावला, विनायक पाटील, रमेश पवार, संजय सिंग, जाफरभाई, समई, परेश गाला, जितू दायमा, विकास कोवे, अजय जाधव, श्रवण झा, प्रमोद नार्वेकर, शेलटकर व अमित (विश्वास) यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. अदिती तसेच खजिनदार-सचिव राजेंद्र ग. बावेकर यांनी उपस्थित मान्यवर, डॉक्टर व स्वयंसेवकांचे आभार मानले. भविष्यातही गरजूंसाठी अशाच प्रकारचे आरोग्यविषयक समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविण्यात येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


