मुंबई प्रतिनिधी
सोशल मीडियावर ‘खाकी स्वॅग’ दाखवत वर्दीत रील्स किंवा व्हिडीओ तयार करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर लगाम घालण्यासाठी मुंबई पोलीस दलाने कठोर निर्णय घेतला आहे. कर्तव्यावर असताना किंवा गणवेशात कोणत्याही प्रकारचे मनोरंजनात्मक व्हिडीओ चित्रित करणे व ते समाजमाध्यमांवर प्रसारित करणे यास आता पूर्णतः मनाई करण्यात आली आहे. नियमभंग करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
या संदर्भातील अधिकृत आदेश २० फेब्रुवारी २०२६ रोजी जारी करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी तत्काळ सुरू करण्यात आली आहे. पोलीस दलातील व्यावसायिक शिस्त, प्रतिमा आणि गोपनीयतेचे संरक्षण हा निर्णयामागील उद्देश असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
अलीकडच्या काळात काही कर्मचारी ड्युटीदरम्यान वर्दीतच डान्स, व्यायाम किंवा दैनंदिन कामकाजाचे क्षण चित्रित करून ‘खाकी स्वॅग’ या नावाखाली सोशल मीडियावर प्रसारित करत असल्याचे निदर्शनास आले होते. अशा व्हिडीओंमध्ये पोलीस ठाण्यांची अंतर्गत रचना, वाहने, शस्त्रसाठा किंवा संवेदनशील माहिती नकळतपणे उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. सुरक्षेच्या दृष्टीने हे धोकादायक असल्याची नोंद विभागाने घेतली.
विशेष शाखेचे उपायुक्त दत्तात्रय कांबळे यांनी जारी केलेल्या परिपत्रकात सर्व पोलीस ठाण्यांना या नियमाची सक्तीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आदेशाचे पालन होत आहे की नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र सोशल मीडिया निरीक्षण यंत्रणाही कार्यरत ठेवण्यात येणार आहे. उल्लंघन आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्यावर तात्काळ विभागीय कारवाई करण्यात येईल, असे परिपत्रकात नमूद आहे.
या निर्णयामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना वैयक्तिक समाजमाध्यम वापरात अधिक दक्षता बाळगावी लागणार असून, वर्दीतील प्रतिमेचा वापर प्रसिद्धीसाठी करण्यावर आता प्रभावी निर्बंध येणार आहेत.


