पुणे प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती पुन्हा बिघडल्याने त्यांना रविवारी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे दाखल करण्यात आले. अशक्तपणा व शरीरातील द्रवपातळी (डिहायड्रेशन) कमी झाल्याने तपासण्यांसाठी त्यांना रुग्णालयात ठेवण्यात येत असल्याची माहिती त्यांच्या कन्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
We are admitting Baba to Ruby Hall, Pune for follow-up tests and hydration.
Thanking all the doctors and healthcare workers.
— Supriya Sule (@supriya_sule) February 22, 2026
सुळे यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, “बाबांना पुन्हा एकदा रुबी क्लिनिकमध्ये दाखल करत आहोत. काही तपासण्या करण्यात येणार आहेत. त्यांना अशक्तपणा जाणवत असून शरीरातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. त्यामुळे वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात येत आहे.” रुग्णालयाकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पवार यांची प्रकृती स्थिर असून खबरदारीचा उपाय म्हणून सलाईन व इतर उपचार दिले जाणार आहेत.
मागील आठवड्यातही छातीत कफ व खोकल्याचा त्रास झाल्याने पवार यांना बारामतीहून पुण्यात आणून याच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पाच दिवसांच्या उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली होती. त्यानंतर ते बारामतीतील गोविंदबाग निवासस्थानी विश्रांती घेत होते. दरम्यान, कुटुंबीयांशी भेटीगाठी व राजकीय घडामोडींमुळे व्यस्त कार्यक्रमात असताना पुन्हा अशक्तपणा जाणवू लागल्याने त्यांना रविवारी पुन्हा रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.
वैद्यकीय पथक त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून असून आवश्यक चाचण्या करण्यात येणार आहेत. अशक्तपणाव्यतिरिक्त कोणतीही गंभीर लक्षणे नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. पवार यांच्या प्रकृतीबाबत समर्थक व कार्यकर्त्यांतून चिंतेची भावना व्यक्त होत आहे.


