मुंबई प्रतिनिधी
राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) सवलतीच्या प्रवासासाठीच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करत महिलांना मिळणारी ५० टक्के सवलत तसेच ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणारा मोफत प्रवास यासाठी ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (एनसीएमसी) अनिवार्य केला आहे. यापुढे केवळ आधार कार्ड दाखवून सवलत मिळणार नसल्याने प्रवाशांना स्मार्ट कार्ड काढणे बंधनकारक ठरणार आहे.
एसटी प्रशासनाच्या नव्या निर्णयानुसार सवलतींचा लाभ घेण्यासाठी डिजिटल पडताळणी प्रणाली लागू केली जात आहे. सवलतींचा गैरवापर रोखणे, प्रवासाची अचूक नोंद ठेवणे आणि व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणणे या उद्देशाने हा बदल करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
स्मार्ट कार्डशिवाय पूर्ण भाडे
महिला प्रवासी आणि ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना आतापर्यंत आधार कार्ड दाखवून सवलतीच्या दरात तिकीट मिळत होते. मात्र आता एनसीएमसी कार्ड नसल्यास पूर्ण भाडे आकारले जाणार आहे. आधार कार्ड केवळ ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरले जाईल, सवलतीसाठी मात्र स्मार्ट कार्ड आवश्यक राहील.
शुल्क व रिचार्ज अटी
नवीन एनसीएमसी कार्डासाठी १९९ रुपये शुल्क आकारले जाणार असून, आधीचे स्मार्ट कार्ड परत केल्यास १४९ रुपयांत नवीन कार्ड उपलब्ध होईल. कार्डमध्ये किमान १०० रुपयांची शिल्लक असणे आवश्यक आहे. रिचार्ज ५० रुपयांच्या पटीत करता येणार आहे.
ग्रामीण प्रवाशांची अडचण
सवलतीसाठी आधारची सोपी पद्धत बंद झाल्याने ग्रामीण भागातील महिला व ज्येष्ठ नागरिकांना आगारांपर्यंत जाऊन कार्ड काढणे व रिचार्ज करणे त्रासदायक ठरू शकते, अशी प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त होत आहे. काही ठिकाणी मशीन बिघाड किंवा नेटवर्क समस्येमुळे सवलत मिळण्याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
एसटी प्रशासनाने मात्र सर्व आगारांमध्ये नोंदणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगितले असून सवलतीचे मानकरी प्रवाशांनी तातडीने एनसीएमसी कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन केले आहे.
सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड प्रणाली राज्यभर टप्प्याटप्प्याने लागू केली जाणार असल्याची माहिती एसटी अधिकाऱ्यांनी दिली.


