सातारा प्रतिनिधी
शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला स्वराज्याची राजधानी मानल्या जाणाऱ्या ऐतिहासिक किल्ले अजिंक्यतारा किल्ल्यावर पार पडलेल्या भव्य ‘मशाल महोत्सवा’ने साताऱ्याच्या सांस्कृतिक अवकाशात तेजोत्सवाची अविस्मरणीय छटा निर्माण केली. सातारा नगरपालिकेच्या वतीने आयोजित या महोत्सवात सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या गडकोटावर हजारो मशालींच्या उजेडात शिवकालीन स्मृती जणू सजीव झाल्याचा प्रत्यय उपस्थितांना आला. राज्यभरातून आलेल्या शिवभक्तांच्या उपस्थितीने किल्ल्याचा परिसर अक्षरशः फुलून गेला होता.
शिवजयंती निमित्ताने अजिंक्यताराच्या तटबंदीवर, महाद्वार परिसरात तसेच किल्ल्याच्या चढावावरील वाटांवर शिस्तबद्ध रांगेत प्रज्वलित करण्यात आलेल्या मशालींनी संपूर्ण गडाला तेजस्वी रूप प्राप्त झाले होते. विद्युत रोषणाई, पारंपरिक दीपप्रज्वलन आणि मशालींच्या उजेडाचा संगम साधत साकारलेले दृश्य पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ‘जय भवानी… जय शिवाजी’च्या घोषणांनी गड दुमदुमला, तर ढोल-ताशांचा गजर, शिवगर्जना आणि शिवगीतांनी वातावरण भारावून गेले.
या सोहळ्याला खासदार उदयनराजे भोसले तसेच आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी उपस्थिती लावून शिवभक्तांशी संवाद साधला. मशाल महोत्सवाचा शुभारंभ शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते झाला. साताऱ्यातील विविध सामाजिक संघटना, युवक मंडळे, शिवप्रेमी नागरिक आणि तरुणाई मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. ‘स्वराज्याचा तेजोत्सव’ अशी ओळख प्राप्त झालेल्या या महोत्सवात ऐतिहासिक परंपरेचा आणि आधुनिक प्रकाशयोजनांचा सुंदर मिलाफ दिसून आला.
किल्ल्याच्या उंच माथ्यावरून दिसणाऱ्या सातारा शहराच्या प्रकाशरेषांमध्ये आणि गडावरील मशालींच्या सुवर्णरेषांमध्ये विलक्षण दृश्यात्मक सुसंवाद अनुभवायला मिळत होता. अनेकांनी हा सोहळा ‘याचि देही, याचि डोळा’ अनुभवत मोबाईल आणि कॅमेऱ्यात टिपला. सामाजिक माध्यमांवर या वर्षीच्या मशाल महोत्सवाचे असंख्य व्हिडीओ आणि छायाचित्रे प्रसारित झाली असून अजिंक्यताराच्या तेजोत्सवाने राज्यभरातील शिवप्रेमींमध्ये उत्साहाची लाट उसळली आहे.
कार्यक्रम अत्यंत नियोजनबद्ध व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. स्वयंसेवकांनी गर्दी नियोजन, मार्गदर्शन आणि सुरक्षा व्यवस्था सुरळीत ठेवली. ऐतिहासिक वारसा आणि सांस्कृतिक अस्मिता जपणाऱ्या साताऱ्याच्या परंपरेला साजेसा हा तेजोत्सव यंदाही यशस्वी ठरला असून शिवजयंतीच्या उत्सवाला अनोखी तेजस्वी सलामी मिळाली आहे.


