मुंबई प्रतिनिधी
देशातील सध्याच्या राजकीय व सामाजिक परिस्थितीत ध्रुवीकरणाचे वातावरण निर्माण केले जात असून, अशा प्रवृत्तीमुळे देशभरात दुसऱ्या ‘गोधरा’सारख्या घटनेची शक्यता निर्माण होत असल्याचे खळबळजनक विधान वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी महापालिका निवडणुकांच्या निकालांचे विश्लेषण, मुस्लिम प्रतिनिधित्व, तसेच ‘अग्निवीर’ प्रश्नावर भूमिका मांडली.
महापालिका निवडणुकांचे चित्र माध्यमांकडून चुकीच्या पद्धतीने मांडले जात असल्याची टीका करताना आंबेडकर म्हणाले, मुस्लिम समाज काँग्रेससोबत राहिलेला नसून त्याने AIMIM हा पर्याय स्वीकारला आहे, असे चित्र रंगवले जात आहे. मात्र प्रत्यक्षात काँग्रेस किंवा इतर पक्षांसोबत असताना मुस्लिम प्रतिनिधींची संख्या २४०-२५०च्या घरात होती; आता ती घटली आहे. तरीही माध्यमांकडून “मुस्लिमांच्या हाती राजकारण जात आहे” असा संदेश दिला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
या पार्श्वभूमीवर समाजात भीती व संशयाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगून आंबेडकर म्हणाले, “हिंदूंनी सावध राहावे, तलवारी काढून राहावे” असे वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न दिसत आहेत. अशा प्रकारचे ध्रुवीकरण वाढल्यास देशभरात दुसऱ्या ‘गोधरा’सारखी घटना घडू शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, इतिहासाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना आंबेडकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान या दोघांचाही लढा ब्रिटिशांविरोधात होता. टिपू सुलतानला पराभूत करण्यासाठी पेशवे कोणासोबत गेले होते, हा इतिहास मुख्यमंत्र्यांनी वाचावा. अगदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यकर्त्यांनी लिहिलेला इतिहास वाचला तरी चालेल, असा टोला त्यांनी लगावला.
‘अग्निवीर’ना आर्मी ॲक्ट लागू करण्यासाठी कायदेशीर लढा
अग्निवीर योजनेच्या घटनात्मक वैधतेसंदर्भात न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याचे सांगताना आंबेडकर म्हणाले, केंद्र सरकारला लष्करी भरतीचे अधिकार Indian Army Act मधून मिळतात. युद्धभूमीवर नेल्यानंतर जवानाला आर्मी ॲक्ट लागू होतोच; त्यामुळे सीमारेषेवर लढताना हुतात्मा झालेल्या अग्निवीर जवानाला पूर्ण मोबदला व सन्मान मिळाला पाहिजे, यासाठी आमची कायदेशीर लढाई सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


