मुंबई प्रतिनिधी
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत पुन्हा एकदा घातपाताच्या आरोपांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत “पायलटचा वापर करून विमान मुद्दाम खाली आदळवण्यात आले आणि मोठा स्फोट घडवण्यासाठी अतिरिक्त इंधन भरले गेले,” असा गंभीर दावा करत नव्या संशयांना तोंड फोडले.
रोहित पवार म्हणाले की, “अजितदादांच्या विमानाचा स्फोट इतका मोठा का झाला, हा प्रश्न आम्ही सुरुवातीपासून उपस्थित केला होता. आता मिळणाऱ्या माहितीनुसार विमानाच्या शेवटच्या भागात अतिरिक्त इंधन टँक ठेवण्यात आले होते. त्या भागाजवळच ब्लॅक बॉक्स असतो. आधी त्या इंधन कंटेनरना आग लागली आणि त्यानंतर पंखातील इंधनाने पेट घेतला. बारामतीसारख्या अल्प अंतराच्या प्रवासासाठी विमानात इतके इंधन भरण्याचे कारण काय? त्यामुळे हा अपघात नसून घातपात असण्याची आमची शंका अधिक बळकट होत आहे,” असा आरोप त्यांनी केला.
दृश्यमानता निकषांवर प्रश्न
उड्डाण प्रक्रियेतील तांत्रिक बाबींवरही रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केले. “फ्लाइट प्लॅनमध्ये मूळ विमानतळासह पर्यायी विमानतळ द्यावा लागतो. पुणे किंवा सोलापूर पर्याय देता येत नसल्यास मुंबईच पर्याय राहतो. मात्र बारामतीत त्या दिवशी लँडिंगसाठी आवश्यक किमान ५,००० मीटर दृश्यमानतेऐवजी सुमारे ३,००० मीटरच दृश्यमानता होती. तरीही मुंबईहून उड्डाण का करण्यात आले? आणि परिस्थिती प्रतिकूल असल्याचे कळल्यानंतर लँडिंगचा प्रयत्न का झाला?” असा सवाल त्यांनी केला.
तपासात विलंबाचा आरोप
अपघात तपास प्रक्रियेवरही रोहित पवारांनी शंका उपस्थित केली. “तपास मुद्दाम लांबवला जात आहे. व्हीएसआर नावाच्या कंपनीमार्फत नवी कागदपत्रे तयार केली जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे फ्लाइट प्लॅनसारख्या कागदपत्रांऐवजी ई-मेल, सीसीटीव्ही फुटेज आणि डिजिटल पुरावे तपासात ग्राह्य धरावेत,” अशी मागणी त्यांनी केली.
अधिकृत प्रतिक्रिया प्रतीक्षेत
दरम्यान, अपघाताबाबत अधिकृत तपास यंत्रणांकडून या नव्या आरोपांवर तत्काळ प्रतिक्रिया मिळालेली नाही. विमान दुर्घटनेचे कारण, पायलटची भूमिका आणि विमानातील इंधन संरचना याबाबत अंतिम अहवाल अद्याप जाहीर झालेला नसल्याने या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात नवे वादळ निर्माण झाले आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या विमान अपघाताभोवती घातपाताच्या शक्यतेवरून सुरू असलेला वाद या नव्या दाव्यांमुळे अधिकच तीव्र होण्याची चिन्हे आहेत.


