मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील ऐतिहासिक ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर जे. जे. समूह रुग्णालय अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आरोग्य सुविधांनी सज्ज झाले आहे. मेंदूविकार, बालशस्त्रक्रिया, ईएनटीसह विविध जटिल शस्त्रक्रियांसाठी स्वतंत्र विभाग आणि नऊ मॉड्युलर ऑपरेशन थिएटर कार्यान्वित करण्यात आल्याने सर्वसामान्य रुग्णांसाठी सुरक्षित, संसर्गमुक्त आणि दर्जेदार उपचार उपलब्ध होणार आहेत.
रुग्णालयातील नऊ प्रमुख शस्त्रक्रिया विभागांसाठी स्वतंत्र, नियंत्रित हवेच्या गुणवत्तेची व्यवस्था असलेली मॉड्युलर शस्त्रक्रिया गृहे तयार करण्यात आली आहेत. अत्याधुनिक एंडोस्कोपी व लॅप्रोस्कोपी उपकरणांसह या कक्षांमध्ये जटिल शस्त्रक्रिया संसर्गाचा धोका कमी ठेवत पार पाडता येणार आहेत.
मेंदू व बालशस्त्रक्रियेसाठी विशेष सुविधा
मेंदू व मज्जासंस्थेवरील उपचारांसाठी प्रगत न्यूरोशस्त्रक्रिया विभाग उभारण्यात आला असून मेंदूतील रक्तस्राव, गंभीर डोक्याच्या दुखापती, मणक्याच्या शस्त्रक्रिया आणि नसांशी संबंधित विकारांवर अत्याधुनिक उपकरणांच्या साहाय्याने उपचार होणार आहेत. बालशस्त्रक्रिया विभागात जन्मजात दोष, हर्निया, अपेंडिक्स तसेच आपत्कालीन शस्त्रक्रियांसाठी स्वतंत्र कक्ष उपलब्ध करण्यात आला आहे.
कान-नाक-घसा (ईएनटी) शस्त्रक्रियांसाठीही स्वतंत्र प्रगत सुविधा उभारण्यात आली असून पडदा दुरुस्ती, सायनस, टॉन्सिल यांसारख्या शस्त्रक्रिया अधिक सुरक्षितरीत्या करता येणार आहेत.
अतिदक्षता विभागाचा विस्तार
गंभीर रुग्णसेवेसाठी अतिदक्षता विभागात ३६ खाटांचा सीसीयू आणि ३२ खाटांचा एमआयसीयू सुरू करण्यात आला आहे. ३० अत्याधुनिक व्हेंटिलेटर उपलब्ध झाले असून आणखी ३० व्हेंटिलेटरची खरेदी प्रस्तावित आहे. यामुळे व्हेंटिलेटरअभावी रुग्णांना दाखल करण्यास होणाऱ्या अडचणी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहेत.
१,३०० खाटांसाठी केंद्रीकृत ऑक्सिजन
रुग्णालयातील सर्व १,३०० खाटांना मेडिकल गॅस पाइपलाइन प्रणालीद्वारे ऑक्सिजन, नायट्रस ऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड आणि एअर सप्लायचा थेट पुरवठा सुनिश्चित करण्यात आला आहे. १,००० बेड-हेड पॅनेल बसवून प्रत्येक रुग्णापर्यंत तत्काळ ऑक्सिजन उपलब्ध होईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांसाठी कौशल्य प्रशिक्षण
रुग्णालयाच्या सातव्या मजल्यावर अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण प्रयोगशाळा आणि प्रशासकीय सभागृह सुरू करण्यात आले आहे. यामुळे वैद्यकीय विद्यार्थ्यांना आधुनिक उपकरणे आणि शस्त्रक्रिया तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे.
डिजिटल आणि रक्तपेढी सक्षमीकरण
शस्त्रक्रियेवेळी दूरस्थ तज्ज्ञांशी थेट संवाद साधण्याची डिजिटल सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. रक्तपेढीतील अद्ययावत यंत्रणेमुळे आपत्कालीन रक्तपुरवठा अधिक वेगवान आणि सुलभ झाला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग आणि रुग्णालय प्रशासनाच्या समन्वयातून हा आधुनिकीकरण प्रकल्प पूर्ण झाला आहे. “नऊ स्वतंत्र मॉड्युलर ऑपरेशन थिएटरमुळे उपचार प्रक्रिया अधिक सुव्यवस्थित आणि सुरक्षित झाली आहे. सरकारी रुग्णालयातही खासगी दर्जाच्या सुविधा परवडणाऱ्या दरात उपलब्ध करण्याचा हा महत्त्वाचा टप्पा आहे,” असे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भांडारवार यांनी सांगितले.
या आधुनिकीकरणामुळे महानगरातील सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना उच्च दर्जाची, तातडीची आणि विशेषीकृत आरोग्यसेवा एका छताखाली उपलब्ध होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.


