मुंबई प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रेरणादायी शैक्षणिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सेरेब्रस ट्रस्टच्या वतीने आयोजित हा ज्ञानमेळावा गुरुवार, १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजता अंबे माता मंदिर, युनिट कॉम्प्लेक्स मालाड पश्चिम येथे होणार आहे.
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, अभ्यासाविषयी सकारात्मक दृष्टी आणि स्पर्धा परीक्षांबाबत योग्य मार्गदर्शन निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती आयोजकांनी दिली. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुंबई महापौर आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते प्रा. सुनील कदम उपस्थित राहणार आहेत.
मेळाव्यात ‘विज्ञान आणि चमत्कार – सत्य काय?’, ‘पाढे शिका झटपट – गणित होईल सोपे’, ‘परीक्षेत १०० टक्के गुण कसे मिळवावेत?’ तसेच ‘मी जीवनात यशस्वी कसा होणार?’ या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या मनातील गैरसमज दूर करून अभ्यास सुलभ व परिणामकारक करण्यासाठी प्रात्यक्षिकांसह संवादात्मक सत्रे पार पडतील, असेही स्पष्ट करण्यात आले.
शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर महाराजांचा पराक्रम, शिस्त आणि दूरदृष्टी यांचा आदर्श समोर ठेवून विद्यार्थ्यांनी शिक्षणातून उज्ज्वल भविष्य घडवावे, हा मेळाव्याचा मुख्य हेतू असल्याचे आयोजकांनी नमूद केले.
कार्यक्रमासाठी विद्यार्थी, पालक व युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रथमेश पडवळे, संकेत जाधव, कुणाल महाडिक व संदेश चेंदवणकर हे सहआयोजक म्हणून कार्यरत आहेत.
शैक्षणिक मार्गदर्शनासोबत प्रेरणादायी विचारांचा संगम साधणारा हा मेळावा शिवजयंती उत्सवाला ज्ञानाचा नवा आयाम देईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.


