नवी मुंबई प्रतिनिधी
शिवसेना शिंदे गटावर तीव्र शब्दांत हल्ला चढवत वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट इशारा दिला आहे. “माझ्या नादाला लागाल तर तुमचे ठाणे-पालघर जिल्ह्यातील एकही महापालिका येऊ देणार नाही; तुमची राजकीय कारकीर्द संपवल्याशिवाय शांत बसणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
वाशी येथील एका कार्यक्रमातील मुलाखतीत नाईक यांनी शिंदे गटावर गंभीर आरोप करत “भस्मासुर-बकासुरांची अवलाद महाराष्ट्र लुटत आहे; राज्य दहा वर्षे मागे गेले,” अशी टीका केली. नवी मुंबईतील आपले राजकीय अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न महापालिका निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणात फोडाफोडी करून करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र “नवी मुंबईकरांनी त्यांच्या डावाचा पराभव केला,” असेही ते म्हणाले.
वनजमिनींचे रक्षण करण्याचा इशारा
वन विभागाच्या जमिनी बळकावून बिल्डरांना देण्याचा कट शिंदे गटाने रचल्याचा आरोप नाईक यांनी केला. “मी वनमंत्री असताना वन विभागाची एक इंच जमीनही कोणाच्या घशात जाऊ देणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.
१४ गावांच्या समावेशावर वाद
कल्याण ग्रामीणमधील १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्याचा ठराव आपणच मार्गदर्शनाखाली मंजूर करून घेतल्याचे नाईक यांनी सांगितले. या गावांसाठी ५०० कोटींचा निधी, भंगार गोडाऊन हटवणे आणि पारसी डोंगर बोगद्याची मागणी केल्याचा दावा त्यांनी केला. मात्र समावेशाच्या निर्णयात आपल्याला डावलण्यात आल्याचा आरोप त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केला.
श्रीकांत शिंदे यांचे प्रत्युत्तर
या वक्तव्यांवर प्रतिक्रिया देताना कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाईक यांना आव्हान दिले. “खुमखुमी असेल तर कल्याण ग्रामीण किंवा ठाणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून जिंकून दाखवावे,” असे त्यांनी म्हटले.
फडणवीसांकडे नाराजी
१४ गावांच्या समावेशावर आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती; त्यांनी तूर्तास थांबण्यास सांगितले होते, असे नाईक यांनी सांगितले. संबंधित गावांना शासनाने ठरलेला निधी द्यावा, या मागणीवर भाजप ठाम असल्याचे त्यांनी नमूद केले.
“पुरावे माझ्याकडे”
शिंदे गटाने निवडणुकांत पैशांचा वापर केल्याचा आरोप करत “ही पापे उघड झाली तर अनेक जण तुरुंगात जातील; माझ्याकडे सर्व पुरावे आहेत,” असा दावा नाईक यांनी केला. तसेच “परवानगी मिळाल्यास तुमच्या पुत्राला नावापुढे ‘माजी खासदार’ लिहावे लागेल,” अशी टीकाही त्यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर केली.


