कोल्हापूर प्रतिनिधी
पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथे ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी एका झाडावर तरुणीचा फोटो आणि काळी बाहुली हळद-कुंकू लावून खिळ्याने ठोकल्याचा प्रकार उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हा प्रकार अंधश्रद्धेचा भाग आहे की एखाद्या तरुणीची बदनामी अथवा धमकावण्याचा प्रयत्न, याबाबत चर्चा सुरू झाली असून पोलिस तपासाची मागणी होत आहे.
आनंदनगर परिसरात सकाळी फिरण्यासाठी गेलेल्या काही नागरिकांच्या निदर्शनास हा प्रकार आला. झाडावर एका तरुणीचा छायाचित्र आणि त्याच्याजवळ काळी बाहुली खिळ्याने ठोकलेली दिसली. दोन्हीवर हळद-कुंकू लावण्यात आले होते. त्यामुळे हा प्रकार ‘भानामती’शी संबंधित असल्याची चर्चा परिसरात रंगली. काहींनी मात्र हा एखाद्या व्यक्तीला मानसिक धाक दाखवण्याचा किंवा जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न असू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली.
संबंधित तरुणीची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही. हा प्रकार नेमका कोणी आणि कोणत्या उद्देशाने केला, याबाबत संभ्रम आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशीच घटना घडल्याने वैयक्तिक वाद, सूडबुद्धी किंवा सामाजिक माध्यमांवरील वादातून हा प्रकार घडला असावा, अशीही चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे.
घटनेमुळे परिसरातील महिलांमध्ये अस्वस्थता पसरली असून, अशा प्रकारांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. काही सामाजिक कार्यकर्त्यांनीही या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासावे, दोषींना शोधून काढावे आणि कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.
दरम्यान, या प्रकारामुळे अंधश्रद्धा आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पोलिसांकडून अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.


