मुंबई प्रतिनिधी
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना लीलावती रुग्णालयाच्या कार्यकारी संचालक पदावरून बडतर्फ करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. रुग्णालयाच्या माजी विश्वस्तांविरोधात त्यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात तब्बल १२०० कोटी रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराची तक्रार दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याने वाद अधिकच चिघळला आहे.
पोलीस दलातून निवृत्तीनंतर जुलै २०२४ मध्ये परमबीर सिंग यांची लीलावती रुग्णालयाच्या कार्यकारी संचालकपदी पाच वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्यांच्या कार्यकाळात रुग्णालयाच्या अंतर्गत व्यवस्थापनात तीव्र मतभेद आणि तणाव निर्माण झाल्याचे चित्र समोर आले होते.
रुग्णालयातील काही डॉक्टरांनी पदोन्नतीसाठी प्रत्येकी २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप सिंग यांच्यावर केला होता. तसेच आपल्या अधिकाराचा गैरवापर करत डॉक्टरांकडून कोऱ्या कागदांवर स्वाक्षरी करून घेण्याचा दबाव टाकल्याचे आरोपही विश्वस्तांच्या वतीने करण्यात आले होते. या सर्व घटनांमुळे रुग्णालयात अस्थिरता निर्माण झाली, असा दावा विश्वस्तांनी केला आहे.
खंडणी, धमकावणे आणि अधिकारांचा गैरवापर यासंदर्भातील तक्रारींची छाननी केल्यानंतर विश्वस्त मंडळाने परमबीर सिंग यांना राजीनामा देण्यास सांगितले होते. मात्र त्यांनी त्यास नकार दिल्याने अखेर त्यांची बडतर्फी करण्यात आली.
दरम्यान, बडतर्फीपूर्वीच परमबीर सिंग यांनी लीलावती रुग्णालयाच्या माजी विश्वस्तांविरोधात १२०० कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याची तक्रार दाखल केली होती. आपली उचलबांगडी ही सूडबुद्धीने करण्यात आल्याचा आरोप करत या निर्णयाला सक्षम न्यायालयात आव्हान देणार असल्याचे सिंग यांनी स्पष्ट केले आहे.
जुलै २०२४ मध्ये सुरू झालेला त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ अवघ्या काही महिन्यांतच संपुष्टात आल्याने लीलावती रुग्णालयातील प्रशासन आणि व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.


