स्वप्नील गाडे| रिपोर्टर
मुंबई : राज्यात गुटखा विक्री व साठवणुकीवर बंदी असतानाही गुजरातसह इतर राज्यांतून अवैध गुटखा मुंबईत आणला जात असल्याची घटना पुन्हा समोर आली आहे. समतानगर पोलिसांनी आज पहाटे धडक कारवाई करत गुजरातहून मुंबईत येणारा कंटेनर अडवून सुमारे २ कोटी रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधून मोठ्या प्रमाणावर अवैध ब्रँडेड गुटखा घेऊन एक कंटेनर मुंबईकडे येत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. संबंधित कंटेनर दहिसर तपासणी नाका पार करून मुंबईत प्रवेश केल्याची खात्री झाल्यानंतर समतानगर पोलिसांनी तातडीने सापळा रचला. पोलिसांनी एमएच ४३ बीजी ४१५० क्रमांकाचा कंटेनर अडवून त्याची तपासणी केली.
तपासणीदरम्यान कंटेनरमध्ये विविध प्रतिबंधित गुटखा ब्रँड मोठ्या प्रमाणावर साठवून ठेवलेले आढळले. जप्त करण्यात आलेल्या गुटख्यामध्ये विमल, रजनीगंधा, ००, रामनिवास, राजश्री, आरएमडी ००, सिग्नेचर ००, कमला पसंद यांसह अन्य ब्रँडचा समावेश आहे. हा गुटखा वेगवेगळ्या पोत्यांमध्ये लपवून ठेवण्यात आला होता.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून चौकशी सुरू आहे. या तस्करीमागील मुख्य सूत्रधार आणि गुटखा माफियांच्या जाळ्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार जप्त करण्यात आलेल्या गुटखा आणि कंटेनरची एकूण किंमत सुमारे २ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, गुटखा तस्करी रोखण्यासाठी पोलिसांकडून तपासणी अधिक कडक करण्यात येत असून संबंधित माफियाविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.


