पुणे प्रतिनिधी
पुणे शहर पोलीस दलातील बहुप्रतिक्षित पोलीस भरती प्रक्रियेचा प्रारंभ १६ फेब्रुवारीपासून होत असून, यंदा तब्बल १,६३३ पोलीस शिपाई, १०५ वाहनचालक आणि ३३ बँडमन पदांसाठी एक लाख ३९ हजारांहून अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. याशिवाय कारागृहातील १३३ शिपायांच्या भरतीसाठी ४६ हजार उमेदवारांनी नोंदणी केली आहे.
ही भरती प्रक्रिया शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालय तसेच रामटेकडीतील राज्य पोलीस दलाच्या मैदानावर पार पडणार आहे. १६ फेब्रुवारीपासून शारीरिक (मैदानी) चाचण्यांना सुरुवात होईल. त्यानंतर पात्र उमेदवारांसाठी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय पाटील यांनी दिली.
भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह व्हावी यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. शारीरिक चाचणीदरम्यान उमेदवारांची उंची व छातीचे मोजमाप घेतले जाणार असून, १०० मीटर धावणे, १,६०० मीटर धावणे (महिला उमेदवारांसाठी ८०० मीटर), तसेच गोळाफेक या चाचण्या घेतल्या जाणार आहेत.
भरती प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी ‘आरएफआयडी’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून, संपूर्ण प्रक्रिया सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली पार पडणार आहे. उमेदवारांची धावण्याची वेळ व चाचणीतील कामगिरी अचूकपणे नोंदवली जाणार असून, मानवी हस्तक्षेप टाळण्यात येईल, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
मैदानी चाचणीनंतर पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येणार असून, भरती प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक टप्प्याटप्प्याने अधिकृत संकेतस्थळ व संदेशाद्वारे उमेदवारांना कळवण्यात येणार आहे.
दरम्यान, लेखी परीक्षेच्या टप्प्यात विशेष दक्षता घेण्यात येणार आहे. परीक्षा घेणाऱ्या अधिकाऱ्यांना मोबाइल वापरण्यास मनाई करण्यात आली असून, परीक्षा केंद्रांवर कडक बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. उमेदवारांनी दलालांच्या किंवा मध्यस्थांच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. कोणताही गैरप्रकार आढळल्यास तात्काळ ७३९१०८२६११ या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय पाटील यांनी सांगितले.


