मुंबई प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणासाठी आयुष्यभर हालअपेष्टा सहन करणाऱ्या त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एक अनोखा उपक्रम समोर आला आहे. ‘गोल्डन मॅन’ म्हणून ओळखले जाणारे उद्योजक रोहित पिसाळ यांनी माता रमाबाई यांच्या स्मरणार्थ तब्बल ३९ कोटी रुपयांची साडी तयार करण्याचा संकल्प केला आहे.
या साडीसाठी सुमारे दोन किलो सोन्याचा वापर करण्यात येणार असून, संपूर्ण साडीवर सोन्याचा मुलामा दिला जाणार आहे. विशेष म्हणजे माता रमाबाई यांच्या कपाळावरील कुंकवाच्या स्थानी ३३ कोटी रुपयांचे हिरे जडवले जाणार आहेत. ही साडी माता रमाबाईंच्या त्यागाचे आणि योगदानाचे प्रतीक म्हणून साकारण्यात येत असल्याचे पिसाळ यांनी सांगितले.
“जगातला प्रत्येक मुलगा आपल्या आईसाठी काहीतरी करायचा प्रयत्न करतो. माझ्या आईसाठी मी माझ्या कष्टाच्या कमाईतून ही भेट देत आहे,” अशा भावना रोहित पिसाळ यांनी व्यक्त केल्या. बाबासाहेबांना परदेशात शिक्षण घेता यावे यासाठी रमाई मातेने मुंबईत अतिशय प्रतिकूल परिस्थितीत संसार सांभाळला. बाबासाहेबांच्या जीवनप्रवासात त्यांचे योगदान अतुलनीय असल्याचेही त्यांनी नमूद केले.
ही साडी तयार झाल्यानंतर साधारण एक महिनाभर देशभर प्रदर्शित करण्यात येणार असून, त्यानंतर लंडनमधील बकिंगहॅम पॅलेसमध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्याचा मानस असल्याचे पिसाळ यांनी सांगितले. लंडनमध्ये उपाशीपोटी शिक्षण घेत असताना बाबासाहेबांच्या पाठीशी रमाई मातेचा मोठा त्याग होता, याची जाणीव म्हणून हे प्रदर्शन लंडनमध्ये होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कोण आहेत ‘गोल्डन मॅन’ रोहित पिसाळ?
रोहित पोपट पिसाळ हे महाराष्ट्रातील परिचित उद्योजक असून ‘गोल्डन मॅन’ म्हणून त्यांची ओळख आहे. पाण्याखालील सोन्याच्या खाणकामात त्यांचा व्यवसाय असून, ‘क्षुशा फॅशन हाऊस’चे ते संस्थापक आहेत. कठीण आजारावर मात करत त्यांनी इंडोनेशियात सोन्याच्या खाणकामाचे प्रकल्प राबवले आहेत. सोन्याचे बुद्ध लॉकेट परिधान करणे आणि त्यांच्या वेगळ्या व्यावसायिक वाटचालीमुळे ते नेहमीच चर्चेत असतात.


