मुंबई प्रतिनिधी
मुंबईत पुन्हा एकदा ‘बड्या बापाच्या’ अल्पवयीन मुलाच्या बेदरकार वाहनचालकतेचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्याविहार परिसरात सोमय्या महाविद्यालयाच्या गेट क्रमांक ३ समोर भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने पती-पत्नी गंभीर जखमी झाले असून दोघेही मृत्यूशी झुंज देत आहेत.
५ फेब्रुवारीच्या रात्री उशिरा धुरमिल पटेल आणि मिनल पटेल हे परळ येथील दुकान बंद करून दुचाकीवरून घाटकोपर येथील घरी जात असताना हा अपघात घडला. १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा किया सेल्टॉस ही कार बेदरकारपणे चालवत होता. वेगावरचा ताबा सुटल्याने कार थेट दुचाकीवर आदळली.
या भीषण धडकेत धुरमिल पटेल यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून छातीच्या बरगड्या, डावा गुडघा आणि उजव्या मनगटाला फ्रॅक्चर झाले आहे. मिनल पटेल यांच्या उजव्या हाताला फ्रॅक्चर झाले असून उजव्या डोळ्याला तसेच गुप्तांगाला गंभीर इजा झाली आहे. दोघांवरही सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या प्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलगा तसेच कारमालक असलेल्या त्याच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित कार वडिलांच्या नावावर नोंदणीकृत असून त्यांचे नाव वालजी राजा भूषण असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
महानगरात वारंवार घडणाऱ्या अशा अपघातांमुळे अल्पवयीनांकडून वाहनचालना, पालकांची जबाबदारी आणि कायद्याची अंमलबजावणी यावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.


