नवी मुंबई प्रतिनिधी
नवी मुंबई महापालिकेच्या ३० वर्षांच्या इतिहासात प्रथमच भाजपचा महापौर विराजमान झाला असून, भाजपच्या सुजाता पाटील यांची महापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे. वनमंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या महापालिका निवडणुकीनंतर हे राजकीय परिवर्तन घडून आले आहे.
आज (ता. ५) झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत ऐनवेळी शिवसेनेच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपच्या सुजाता पाटील आणि उपमहापौरपदी दशरथ भगत यांची बिनविरोध निवड झाली. या घडामोडीमुळे नवी मुंबईतील महापालिकेची राजकीय समीकरणे पूर्णतः बदलली आहेत.
महापौर निवडीपूर्वी भाजप आणि शिवसेना यांच्यात चुरशीची लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. सकाळपासून महापालिका सभागृहात हालचालींना वेग आला होता. दोन्ही पक्षांचे उमेदवार बसमधून महापालिका मुख्यालयात दाखल झाले होते. मात्र, प्रत्यक्ष मतदानापूर्वीच शिवसेनेने माघार घेतल्याने भाजपचा मार्ग मोकळा झाला.
वनमंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली भाजपने नवी मुंबई महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. १११ सदस्यांच्या सभागृहात भाजपचे ६५ नगरसेवक निवडून आले असून, त्यामुळे महापालिकेतील सत्ता निर्विवादपणे भाजपकडे गेली आहे. १९९४ मध्ये स्थापन झालेल्या नवी मुंबई महापालिकेवर यापूर्वी एकदाही भाजपची सत्ता आलेली नव्हती. २०१५ च्या निवडणुकीत भाजपचे केवळ सहा नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशानंतर झालेल्या या निवडणुकीत पक्षाने मोठी झेप घेतली आहे.
महापौरपदी निवड झाल्यानंतर सुजाता पाटील यांनी शहराच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला. पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि वाहतूक व्यवस्था सुधारण्यावर भर देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. उपमहापौर दशरथ भगत यांनी महापालिकेतील प्रशासन अधिक पारदर्शक व लोकाभिमुख करण्याचा संकल्प व्यक्त केला.
दरम्यान, शिवसेनेच्या उमेदवारांनी माघार घेण्यामागची कारणे राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली असून, आगामी काळात विरोधी पक्षाची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नवी मुंबईतील आजवरच्या महिला महापौर
१९९६ – सुषमा दंडे
१९९८ – विजया म्हात्रे
२००५ – मनीषा भोईर
२००७ – अंजनी भोईर


