मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी दोन प्रवासी विमानांच्या पंखांची एकमेकांशी धडक झाल्याची घटना घडली. एअर इंडियाचे आणि इंडिगोचे एअरबस A320 प्रकारचे विमान टॅक्सी प्रक्रियेदरम्यान एकमेकांच्या अत्यंत जवळ आल्याने हा प्रकार घडल्याचे प्राथमिक माहितीतून स्पष्ट झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा प्रवाशांना इजा झालेली नाही.
वृत्तानुसार, एअर इंडियाचे AI 2732 (VT-TYF) हे विमान मुंबईहून कोइम्बतूरला जाण्यापूर्वी पुशबॅक आणि टॅक्सी प्रक्रियेत होते. त्याचवेळी हैदराबादहून मुंबईला आलेले इंडिगोचे 6E 791 (VT-IFV) हे विमान लँडिंगनंतर टॅक्सीवे B1 मार्गे पुढे नेत असताना दोन्ही विमानांच्या उजव्या पंखांच्या टोकांचा परस्पर संपर्क झाला.
या घटनेनंतर सुरक्षेच्या दृष्टीने दोन्ही विमाने तत्काळ ग्राउंड करण्यात आली. सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले असून विमानतळावरील हालचालींवर काही काळ परिणाम झाला.
दरम्यान, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (DGCA) मुंबई कार्यालयातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.
एअर इंडियाने दिलेल्या निवेदनात, “दोन्ही विमानांच्या पंखांच्या टोकांना हलका स्पर्श झाला असून आमच्या विमानाच्या पंखांना नुकसान झाले आहे. सर्व प्रवासी सुरक्षित असून त्यांच्या पुढील प्रवासासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे,” असे स्पष्ट करण्यात आले आहे.
इंडिगोनेही या घटनेला दुजोरा देत, “३ फेब्रुवारी २०२६ रोजी आमचे 6E 791 हे विमान लँडिंगनंतर टॅक्सी करत असताना दुसऱ्या एअरलाइनच्या विमानाशी धडकले. सर्व प्रवासी सुरक्षित असून विमानाची तांत्रिक तपासणी सुरू आहे. नियमानुसार संबंधित यंत्रणांना तात्काळ माहिती देण्यात आली आहे,” असे म्हटले आहे.
या घटनेमुळे विमानतळावरील सुरक्षा आणि टॅक्सीवे व्यवस्थापनाबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले असून DGCA च्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


