मुंबई प्रतिनिधी
मुंबईत मराठी–अमराठी वाद पुन्हा एकदा चिघळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शहरातील प्रसिद्ध विकासक सुशील रहेजा यांनी मराठी तरुणाला मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, या प्रकरणी गोवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार तरुण हा चेंबूर येथील डॉ. सी. जी. गिडवाणी रोडवरील रहेजा होम्स कार्यालयात शिपाई म्हणून कार्यरत होता. कार्यालयीन बैठकीदरम्यान कागदपत्रांना ‘स्टॅपल’ योग्य प्रकारे न जोडल्याच्या कारणावरून वाद झाला. याच वादातून रहेजा यांनी तरुणाला मारहाण करत, “तुम घाटी लोग सुधरोगे नही” असे उद्गार काढत जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
तक्रारदार हा अनुसूचित जातीतील असल्याने त्याला नोकरीवरून हुसकावून लावण्याचा आणि कार्यालयात अपमानास्पद वर्तन केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणी गोवंडी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ११५ तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
या घटनेमुळे मुंबईत सामाजिक आणि भाषिक सलोख्याबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले असून, मराठी–अमराठी वादाला पुन्हा हवा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, घटनेबाबत संबंधितांकडून जबाब नोंदवले जात आहेत.


