मुंबई प्रतिनिधी
मुंबईत सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात स्वतःचं घर मिळावं, या उद्देशाने मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) तब्बल १२० घरांची विक्री योजना जाहीर केली आहे. यामध्ये यापूर्वी लॉटरीद्वारे विक्रीसाठी जाहीर करण्यात आलेली, मात्र अद्याप रिक्त राहिलेली घरे ‘प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या योजनेअंतर्गत घरांची किमान किंमत सुमारे ३१ लाख रुपये, तर कमाल किंमत ८ कोटी रुपये इतकी असणार आहे. विशेष म्हणजे, मुंबईतील मोक्याच्या परिसरात असलेली ही घरे असून, ताडदेव येथील घरांची किंमत सर्वाधिक आहे.
५ फेब्रुवारीपासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजल्यापासून ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे. इच्छुक अर्जदारांना प्रथम म्हाडाच्या वेबसाइटवर नोंदणी करावी लागणार असून, १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजल्यापासून घर निश्चिती, अनामत रक्कम व अर्ज शुल्क भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
घर निश्चिती करण्यापूर्वी अर्जदाराने आवश्यक अनामत रक्कम व अर्ज शुल्काचा ऑनलाईन भरणा करणे बंधनकारक आहे. अनामत रक्कम भरल्यानंतर ‘बुक माय होम’ हा पर्याय अर्जदारास उपलब्ध होईल. यामध्ये इमारत, विंग, मजला व घर क्रमांकाची माहिती दिली जाईल. उपलब्ध घरांपैकी इच्छित घर अर्जदार निवडू शकणार आहे.
४८ तासांत १० टक्के रक्कम भरणे बंधनकारक
घर निश्चित झाल्यानंतर ४८ तासांच्या आत घराच्या एकूण विक्री किमतीपैकी १० टक्के रक्कम भरणे अनिवार्य आहे. निर्धारित वेळेत ही रक्कम न भरल्यास संबंधित घरावरील अर्जदाराचा दावा आपोआप रद्द होणार आहे.
१० टक्के रक्कम भरल्यानंतर म्हाडाकडून अर्जदारास तात्पुरते देकारपत्र (Offer Letter) ऑनलाईन पद्धतीने देण्यात येईल. त्यानंतर ९० दिवसांच्या आत उर्वरित संपूर्ण रक्कम भरणे आवश्यक आहे. विलंब झाल्यास अधिकतम ९० दिवसांची मुदतवाढ व्याजासह घेता येणार असून, त्यानंतरही भरणा न केल्यास घराची विक्री कोणतेही कारण न देता रद्द केली जाईल.
सर्व व्यवहार पूर्णपणे ऑनलाईन
सर्व आर्थिक व्यवहार एनईएफटी/आरटीजीएस/नेट बँकिंग/यूपीआय/डेबिट व क्रेडिट कार्डद्वारेच ऑनलाईन पद्धतीने करावे लागणार आहेत.
दलालांपासून सावध राहण्याचे आवाहन
म्हाडाने या योजनेसाठी कोणतेही प्रॉपर्टी एजंट किंवा दलाल नियुक्त केलेले नाहीत. कोणत्याही अनधिकृत व्यक्तीशी आर्थिक व्यवहार केल्यास त्याची जबाबदारी म्हाडावर राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अर्जदारांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास म्हाडाच्या मुख्य दक्षता व सुरक्षा अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कुठे किती घरे?
सामान्य योजनेअंतर्गत – एकूण ८४ घरे :
शिंपोली, कांदिवली – ८
चारकोप, कांदिवली – २
अँटॉप हिल, वडाळा – २७
तुंगा, पवई – ४४
पीएमजीपी, मानखुर्द – १
मालवणी, मालाड – १
गायकवाड नगर, मालवणी – १
विकास नियंत्रण नियमावली ३३(५) व ३३(७) अंतर्गत – एकूण ३६ घरे :
घाटकोपर पूर्व – २
कन्नमवार नगर, विक्रोळी – १
अँटॉप हिल, वडाळा – ८
भायखळा – ६
ताडदेव – ६
लोअर परळ – ४
सायन – २
जेव्हीपीडी, अंधेरी पश्चिम – ७
मुंबईकरांसाठी मोठी संधी
मुंबईतील घरांच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर, म्हाडाची ही योजना सर्वसामान्य व मध्यमवर्गीयांसाठी दिलासादायक ठरण्याची शक्यता आहे. विशेषतः ‘प्रथम येईल त्यास प्राधान्य’ या तत्त्वामुळे इच्छुक नागरिकांनी वेळ न दवडता अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन म्हाडाकडून करण्यात आले आहे.


