बारामती, पुणे प्रतिनिधी
“अजित दादा परत या…”, “अजित दादा अमर रहे…” अशा गगनभेदी घोषणांनी, अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांनी आणि अंतकरणातून उमटलेल्या शोकभावनेने आज अवघा महाराष्ट्र एकवटला होता. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील एक कणखर, करारी नेतृत्व हरपल्याची जाणीव आज प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. बारामती येथे हजारोंच्या जनसागराच्या उपस्थितीत अजित पवार यांच्यावर पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
#WATCH | Baramati | Parth and Jay, sons of Maharashtra Deputy CM Ajit Pawar, light the funeral pyre as they perform the last rites of their father pic.twitter.com/RJpiVGtCu7
— ANI (@ANI) January 29, 2026
अंत्यविधीच्या प्रत्येक क्षणाला वातावरण भारावलेले होते. सामान्य कार्यकर्त्यांपासून ते राज्यातील आणि देशातील दिग्गज नेत्यांपर्यंत, सर्वांनीच आपल्या ‘दादां’ना अश्रूंनी निरोप दिला. अवघा महाराष्ट्र आज सुन्न आणि निःशब्द झाला होता.
पक्षीय भिंती ओलांडून श्रद्धांजली
अजित पवार यांच्या अंतिम दर्शनासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वपक्षीय नेत्यांनी उपस्थिती लावली. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंब या दुःखद प्रसंगी एकत्र होते. शरद पवार यांचे अश्रू अनावर झालेले दृश्य उपस्थितांना अधिकच हेलावून गेले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मुरलीधर मोहोळ, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील, छगन भुजबळ, मंत्री पंकजा मुंडे, नीलम गोऱ्हे, आदिती तटकरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी अखेरचा निरोप दिला.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार शाहू महाराज छत्रपती, तसेच विविध राज्यांतील मंत्री आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. तत्पूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनीही अजित पवार यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.
शासकीय इतमामात मानवंदना
महाराष्ट्र शासनाच्या वतीने अजित पवार यांना पूर्ण शासकीय इतमामात मानवंदना देण्यात आली. पोलिस दलाने हवेत तीन वेळा बंदुकीच्या फैरी झाडून सलामी दिली. त्या क्षणी परिसरात क्षणभर स्तब्धता पसरली. मात्र त्यानंतर जनसमुदायातून उसळलेल्या “एकच वादा, अजित दादा” आणि “अजित दादा अमर रहे” या घोषणांनी आसमंत पुन्हा दणाणून गेला.
पार्थ पवार आणि जय पवार यांनी मुखाग्नी दिला. हा क्षण पाहताना उपस्थित प्रत्येकाचे डोळे पाणावले होते.
आसवांनी भिजलेली बारामती
अजित पवार यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी नेले जात असताना बारामतीतील रस्ते जनसागराने ओसंडून वाहत होते. आपल्या नेत्याची अखेरची झलक पाहण्यासाठी नागरिक घरांच्या छतांवर, झाडांवर उभे राहिले होते. विशेषतः महिला कार्यकर्त्या आणि तरुणांमध्ये शोककळा प्रकर्षाने जाणवत होती.
शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह कुटुंबातील सदस्यांचे अश्रू पाहून उपस्थित जनसमुदायही भावूक झाला. राजकारणातील संघर्ष, विकासकामांचा ध्यास आणि ‘कामाचा माणूस’ अशी ओळख असलेला नेता आज काळाच्या पडद्याआड गेला, याची जाणीव प्रत्येकाला बोचत होती.
आज बारामतीत केवळ एका नेत्याचा अंत्यविधी झाला नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणातील एक युग डोळ्यांसमोर संपल्याची भावना सर्वांच्या मनात ठसठसत राहिली.


