पुणे प्रतिनिधी
‘एकदा मी काम करायचे ठरविले की करतो. मात्र, एखादे काम शक्य नसेल, तर कोणी कितीही जवळचा असू दे, ते होत नाही,’ हे अजित पवारांचे वाक्य त्यांच्या रुबाबदार शैलीसह अनेकांनी ऐकले आहे. या वाक्याच्या दराऱ्याचा आणि त्यांच्या स्वभावातील मिश्किल बाजूचा प्रत्यय देणारा बारामतीतील एक किस्सा आजही आठवणीने सांगितला जातो.
अजित पवार बारामतीत असताना एका गावचा सरपंच गावकऱ्यांच्या आग्रहाखातर त्यांना भेटायला आला होता. भेटीपूर्वीच सरपंचाने दादांकडे एक चिठ्ठी पाठविली. ‘दादा, मला माहिती आहे हे काम होणार नाही. पण गावकऱ्यांच्या आग्रहामुळे मला यावे लागले आहे. कृपया मला त्यांच्यासमोर शिव्या देऊ नका,’ असे त्या चिठ्ठीत लिहिले होते. ही चिठ्ठी वाचताच अजितदादांचे हसू आवरेना आणि त्यांनी पोट धरून हसल्याचे सांगितले जाते.
बारामती नगर परिषदेचे २०१५ ते २०१७ या काळातील मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांना हा प्रसंग प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला. एका प्रकल्पासंदर्भात चर्चा सुरू असताना हा किस्सा घडला. ‘दादांनी ती चिठ्ठी मला वाचायला दिली. मात्र, आपल्या पक्षाचा सरपंच असल्याने त्याला नाराज करायचे नाही, असे सांगत त्यांनी सरपंच आणि गावकऱ्यांना आत बोलावून घेतले. काम का शक्य नाही, त्यामागील अडचणी त्यांनी आपल्या खास शैलीत स्पष्ट केल्या,’ असे देशमुख यांनी सांगितले.
स्वच्छता, रस्ते आणि विकासाबाबत काटेकोर भूमिका
अजित पवार यांची कार्यपद्धती ही नेहमीच शिस्तबद्ध आणि भविष्याचा विचार करणारी होती. ‘स्वच्छता, रस्ते, विकास आराखडा याबाबत ते प्रचंड आग्रही असायचे. अधिकाऱ्यांच्या कामात अनावश्यक ढवळाढवळ त्यांना आवडत नसे. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून कनिष्ठ कर्मचाऱ्यांपर्यंत प्रत्येकाकडून काम करून घेण्याची कला त्यांच्याकडे होती. त्यांच्या कडक स्वभावाचा दरारा वाटायचा; पण निर्णयामागे नेहमीच स्पष्टता आणि दूरदृष्टी असायची,’ असे देशमुख सांगतात.
कडक शिस्त, स्पष्ट भूमिका आणि प्रसंगी उमटणारी अशी मिश्किल प्रतिक्रिया, अजित पवारांच्या व्यक्तिमत्त्वातील हे पैलू बारामतीतील या छोट्याशा किस्स्यातून ठळकपणे समोर येतात.


