पुणे प्रतिनिधी
बारामती येथे घडलेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत अजित पवारांचे अंगरक्षक विदीप जाधव यांचाही समावेश असून, कर्तव्यदक्षता आणि शिस्तप्रियतेसाठी परिचित असलेला एक निष्ठावान पोलीस अधिकारी काळाच्या पडद्याआड गेला आहे.
मुंबई पोलीस दलातील २००९ बॅचचे पोलीस शिपाई असलेले विदीप जाधव हे अजित पवार यांचे अंगरक्षक म्हणून कार्यरत होते. वरिष्ठांच्या सुरक्षिततेची जबाबदारी निभावत असतानाच त्यांच्यावर हा काळाचा घाला आला. कर्तव्यावर असतानाच घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे पोलीस दलात शोककळा पसरली आहे.
कर्तव्यनिष्ठा, शिस्त आणि प्रसंगावधान यासाठी जाधव यांची सहकाऱ्यांत ओळख होती. शांत स्वभाव, मनमिळाऊ वागणूक आणि गरजूंना मदतीचा हात देणारी वृत्ती ही त्यांची वैशिष्ट्ये होती, असे सहकारी सांगतात. त्यांच्या अकाली निधनाने जाधव कुटुंबीयांसह पोलीस दलालाही मोठा धक्का बसला आहे. पोलीस दलाकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
दरम्यान, जाधव राहत असलेल्या चाळीत सकाळी नेहमीप्रमाणे कामावर जाताना अनेकांनी त्यांना पाहिले होते. काही वेळातच दूरदर्शनवर अपघाताची बातमी झळकली आणि मुंबईत राहणाऱ्या त्यांच्या आईने हा धक्का सहन करत टाहो फोडला. बातमी कळताच परिसरातील नागरिक एकत्र आले.
थोड्याच वेळात पोलीस अधिकारी जाधव यांच्या घरी पोहोचले. त्यांच्या आई आणि मुलाला पुढील औपचारिकतेसाठी बारामतीकडे नेण्यात आले. दुर्दैवाची बाब म्हणजे, जाधव यांची पत्नी कालच पनवेल येथे माहेरी गेली होती. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.
कर्तव्याच्या सावलीत आयुष्य व्यतीत करणाऱ्या विदीप जाधव यांचा असा अचानक अंत झाल्याने, ‘पोलीस’ ही ओळख केवळ गणवेशापुरती नसून ती त्याग, शिस्त आणि निष्ठेची जाणीव करून देणारी आहे, अशी भावना सहकाऱ्यांतून व्यक्त होत आहे.


