पुणे प्रतिनिधी
हुंड्याच्या मागण्या, आर्थिक छळ आणि गर्भलिंग तपासणीच्या दबावाला कंटाळून पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन परिसरात एका इंजिनिअर विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन वर्षांच्या चिमुकलीसमोरच आईने गळफास घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पती, सासू-सासरे आणि दिराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे.
दीप्ती मगर-चौधरी (वय अंदाजे ३०) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असून, २५ जानेवारीच्या रात्री सोरतापवाडी (ता. हवेली) येथील राहत्या घरात तिने जीवन संपवले. उरुळी कांचन पोलिस ठाण्यात मृत विवाहितेच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, लग्नानंतर अवघ्या महिन्याभरात दीप्तीच्या छळाला सुरुवात झाली होती.
लग्नानंतर छळ, संशय आणि मारहाण
तक्रारीनुसार, दीप्तीचा विवाह २३ नोव्हेंबर २०१९ रोजी रोहन कारभारी चौधरी याच्याशी झाला होता. सुरुवातीचा एक महिना संसार सुरळीत होता. मात्र त्यानंतर पतीकडून चारित्र्यावर संशय, सासरकडील सदस्यांकडून सतत टोचून बोलणे, मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाला. घरकाम येत नाही, दिसणं साजेसं नाही अशा अपमानास्पद आरोपांबरोबरच मारहाण आणि दमदाटी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
पैशांच्या सतत मागण्या
मृत विवाहितेच्या आईनुसार, पतीच्या व्यवसायासाठी दीप्तीकडून माहेरून १० लाख रुपये मागण्यात आले, जे रोख स्वरूपात देण्यात आले. त्यानंतरही छळ थांबला नाही. लग्नात चारचाकी गाडी न दिल्याचा उल्लेख करून पुन्हा मानसिक त्रास देण्यात आला. अखेरीस, संसार टिकावा म्हणून गाडी खरेदीसाठी २५ लाख रुपये देण्यात आले, असा दावाही तक्रारीत आहे.
लग्नात दिलेले सुमारे ५० तोळे सोन्याचे दागिने सासू आणि पतीने ताब्यात घेतल्याचे, तसेच ते दागिने व्यवसायासाठी बँकेत गहाण ठेवण्यात आल्याचे दीप्तीला नंतर सांगण्यात आल्याचेही आईने म्हटले आहे.
गर्भलिंग तपासणी आणि जबरदस्ती गर्भपाताचा आरोप
तक्रारीतील सर्वात गंभीर आरोप म्हणजे गर्भलिंग तपासणीचा दबाव. दीप्ती गर्भवती असताना, पहिली मुलगी असल्याने पुन्हा गर्भात मुलगाच हवा, असा दबाव सासरकडून टाकण्यात आला. तपासणीला नकार दिल्याने मारहाण, शिवीगाळ आणि घरातून हाकलण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे. अखेरीस दबावाखाली गर्भलिंग तपासणी करण्यात आली आणि गर्भात मुलगी असल्याचे समजताच, दीप्तीच्या इच्छेविरुद्ध गर्भपात करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
गुन्हा दाखल, तपास सुरू
या प्रकरणी पती रोहन चौधरी, सासू सुनीता चौधरी, सासरे कारभारी चौधरी आणि दीर रोहित चौधरी यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता अंतर्गत विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चौघांनाही ताब्यात घेतले असून, प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
दरम्यान, सासू स्थानिक ग्रामपंचायतीची सरपंच असून सासरे शिक्षक असल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर प्रकरणाकडे समाजातील अनेक घटकांचे लक्ष लागले आहे. हुंडा, स्त्रीभ्रूणहत्या आणि कौटुंबिक छळ यासारख्या प्रश्नांवर पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली आहे.


