मुंबई. प्रतिनिधी
भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या भविष्यातील विकासाचा आत्मविश्वासपूर्ण आणि सर्वसमावेशक आराखडा मांडला. महाराष्ट्र हे केवळ एक राज्य नसून देशाच्या आर्थिक प्रगतीचे प्रमुख इंजिन असून, आगामी काळात भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून राज्याची भूमिका अधिक बळकट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ध्वजारोहणानंतर केलेल्या भाषणात फडणवीस यांनी संविधानाचे महत्त्व, लोकशाही मूल्ये आणि आर्थिक प्रगती यांचा परस्परसंबंध अधोरेखित केला. “२६ जानेवारी १९५० रोजी स्वीकारलेल्या संविधानामुळे भारताने लोकशाहीप्रधान प्रजासत्ताकाची वाटचाल सुरू केली. ही लोकशाही अधिक सक्षम करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे,” असे त्यांनी नमूद केले.
गुंतवणूक, रोजगार आणि प्रादेशिक समतोल
महाराष्ट्राच्या विकासाबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, नुकत्याच दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत राज्यासाठी सुमारे ३० लाख कोटी रुपयांच्या गुंतवणूक करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. या गुंतवणुकीचा लाभ केवळ मुंबईपुरता मर्यादित न राहता विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण अशा सर्व भागांपर्यंत पोहोचेल, असा दावा त्यांनी केला.
“महाराष्ट्राची विकासगंगा सर्व जिल्ह्यांतून वाहणार आहे. मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती ही शासनाची प्राथमिकता आहे,” असे फडणवीस म्हणाले.
शेती, पाणी आणि पायाभूत सुविधा
राज्याच्या कृषी धोरणावर भर देताना त्यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राबवण्यात आलेल्या योजनांचा उल्लेख केला. दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल सुरू असून, नदीजोड प्रकल्पांद्वारे सिंचन क्षमता वाढवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
समृद्धी महामार्ग, शक्तीपीठ महामार्ग यांसारख्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे राज्याची आर्थिक गती वाढत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. आदिवासी व अनुसूचित समाजघटकांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध विकास योजनांचा उल्लेख करत “समाजातील प्रत्येक घटक विकासाच्या प्रवाहात सामील व्हावा, हा शासनाचा प्रयत्न आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
‘संविधानाच्या चौकटीत सातत्याने प्रगती’
“महाराष्ट्र थांबणार नाही. संविधानाने दिलेल्या लोकशाही चौकटीत राज्य सातत्याने प्रगतीकडे झेपावत राहील,” असे ठाम मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले.
शहरांची नवी ओळख घडवण्याचा प्रयत्न – एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथे बोलताना ‘सामान्यांच्या राज्य’ या संकल्पनेवर भर दिला. “आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्मलो नाही; मात्र महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या आयुष्यात सुबत्तेचे दिवस आणण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असे ते म्हणाले.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना कायमस्वरूपी सुरू राहील, अशी ग्वाही देत शिंदे यांनी झोपडपट्टीमुक्त शहरे, मेट्रोचे विस्तारित जाळे आणि शहरी पायाभूत सुविधांवर सरकारचा भर असल्याचे सांगितले. ठाण्यात उभारण्यात येणारा २६० मीटर उंच ‘व्ह्यूइंग टॉवर’ शहराची नवी जागतिक ओळख ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.


