मुंबई प्रतिनिधी
राज्यातील एसटी प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे – एसटी संगे तीर्थाटन’ ही नवी योजना सुरू केली असून, स्वस्त, सुरक्षित आणि सुलभ प्रवासाच्या माध्यमातून धार्मिक पर्यटनाला चालना देण्याचा उद्देश आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार ही योजना राबविण्यात येत असून, परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी याबाबत माहिती दिली.
ही योजना केवळ धार्मिक पर्यटनापुरती मर्यादित नसून सामाजिक समावेशकतेवर भर देणारी आहे. श्रद्धास्थळी जाण्याची इच्छा असूनही खर्च, सोयी-सुविधा आणि सुरक्षिततेच्या कारणांमुळे अनेकांना प्रवास शक्य होत नाही. अशा भाविकांसाठी ही योजना महत्त्वाचा आधार ठरणार आहे.
योजनेअंतर्गत राज्य शासनाने जाहीर केलेल्या सर्व सामाजिक सवलती कायम राहणार आहेत. महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना तिकिटाच्या मूळ दरात ५० टक्के सवलत देण्यात येणार असून, ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा मिळणार आहे. प्रत्येक आगारातून ४० प्रवाशांचा गट तयार करून सहली आयोजित केल्या जाणार असून, नव्या आणि आरामदायी बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
ही योजना २३ जानेवारी २०२६ पासून राज्यातील २५१ आगारांत एकाच वेळी सुरू होणार आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार प्रत्येक आगारातून किमान पाच बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार असून, दररोज सुमारे १,००० ते १,२५० विशेष धार्मिक व पर्यटन बसगाड्या धावतील, असा अंदाज आहे.
अष्टविनायक दर्शन, ११ मारुती दर्शन, पंढरपूर-अक्कलकोट, तुळजापूर, कोल्हापूर–पन्हाळा-जोतिबा, गणपतीपुळे, शेगाव, शिर्डी आदी श्रद्धास्थळांच्या सहली या योजनेत समाविष्ट असतील. बाळासाहेब ठाकरे यांच्या शताब्दी जयंतीनिमित्त सुरू होत असलेली ही योजना लाखो भाविकांसाठी सुरक्षित, परवडणारा आणि समाधानकारक प्रवास घडवून आणेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.


