मुंबई प्रतिनिधी
२०११ नंतर प्रथमच होणाऱ्या देशव्यापी जनगणनेच्या प्रक्रियेने वेग घेतला असून, भारताचे रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त यांनी गुरुवारी (२२ जानेवारी २०२६) यासंदर्भातील महत्त्वाची अधिसूचना जारी केली. या अधिसूचनेत जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात नागरिकांना विचारल्या जाणाऱ्या ३३ प्रश्नांची सविस्तर यादी जाहीर करण्यात आली आहे.
जनगणनेचा पहिला टप्पा १ एप्रिल ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार असून, या टप्प्यात घर व कुटुंबाशी संबंधित मूलभूत सामाजिक, आर्थिक आणि पायाभूत सुविधांची माहिती संकलित केली जाणार आहे. घराची रचना, पिण्याच्या पाण्याचा स्रोत, स्वयंपाकासाठी वापरले जाणारे इंधन, शौचालय व स्नानगृहाची उपलब्धता, वीज, इंटरनेट तसेच वाहनांची मालकी अशा विविध बाबींचा यात समावेश आहे.
राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेनुसार, घराच्या फरशीपासून छतासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्यापर्यंत, कुटुंबामध्ये राहणाऱ्या व्यक्तींची संख्या, विवाहित जोडप्यांची संख्या, कुटुंबप्रमुखाचे लिंग व सामाजिक प्रवर्ग, तसेच धान्याच्या वापरासंबंधी माहिती विचारली जाणार आहे. २०२० मध्ये जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचनेत ३१ प्रश्नांचा समावेश होता; मात्र करोना महामारीमुळे २०२१ मधील जनगणना पुढे ढकलण्यात आली. आता त्यामध्ये दोन नव्या प्रश्नांची भर घालून एकूण प्रश्नसंख्या ३३ करण्यात आली आहे.
देशाची पहिली ‘डिजिटल जनगणना’
या जनगणनेचे वैशिष्ट्य म्हणजे ही देशातील पहिली ‘डिजिटल जनगणना’ असणार आहे. लोकसंख्या मोजणीच्या टप्प्यात जातीविषयक माहितीही इलेक्ट्रॉनिक पद्धतीने नोंदवली जाणार असल्याचे सरकारने यापूर्वी स्पष्ट केले आहे. सुमारे ३० लाख गणनाकारांच्या माध्यमातून देशातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचून ही प्रक्रिया राबवली जाणार आहे.
डिजिटल माध्यमांचा वापर केल्यामुळे माहिती संकलन अधिक वेगवान, अचूक आणि पारदर्शक होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर, गोळा करण्यात येणारी माहिती धोरण आखणी, पायाभूत सुविधा विकास आणि कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वाची ठरणार आहे.
जनगणनेत विचारले जाणारे ३३ प्रश्न
जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात पुढील घटकांवर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत
१)इमारत क्रमांक (नगरपालिका/स्थानिक प्राधिकरणाचा किंवा जनगणना क्रमांक)
२) घर क्रमांक
३) घराच्या फरशीचे प्रमुख साहित्य
४) घराच्या भिंतीचे प्रमुख साहित्य
५) घराच्या छताचे प्रमुख साहित्य
६) घराचा वापर
७) घराची स्थिती
८) कुटुंब क्रमांक
९) कुटुंबात राहणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या
१०) कुटुंबप्रमुखाचे नाव
११) कुटुंबप्रमुखाचे लिंग
१२) कुटुंबप्रमुख अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/इतर प्रवर्गातील आहे का
१३) घराच्या मालकीची स्थिती
१४) कुटुंबाच्या विशेष ताब्यात असलेल्या राहण्याच्या खोल्यांची संख्या
१५) कुटुंबात राहणाऱ्या विवाहित जोडप्यांची संख्या
१६) पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत
१७) पिण्याच्या पाण्याच्या स्रोताची उपलब्धता
१८) वीजेचा मुख्य स्रोत
१९) शौचालयाची उपलब्धता
२०) शौचालयाचा प्रकार
२१) सांडपाणी निचरा व्यवस्था
२२) स्नानगृहाची उपलब्धता
२३) स्वयंपाकघर व एलपीजी/पीएनजी कनेक्शनची उपलब्धता
२४) स्वयंपाकासाठी वापरले जाणारे मुख्य इंधन
२५) रेडिओ/ट्रान्झिस्टर
२६) टीव्ही
२७) इंटरनेटची उपलब्धता
२८) लॅपटॉप/संगणक
२९) टेलिफोन/मोबाइल फोन/स्मार्टफोन
३०) सायकल/स्कूटर/मोटरसायकल/मोपेड
३१) कार/जीप/व्हॅन
३२) कुटुंबात सेवन केले जाणारे मुख्य धान्य
३३) मोबाइल क्रमांक (केवळ जनगणनेशी संबंधित संवादांसाठी)
या प्रश्नावलीद्वारे देशातील कुटुंबांचे जीवनमान, सुविधा आणि गरजांचे वास्तव चित्र समोर येणार असून, पुढील दशकासाठी धोरणात्मक निर्णयांना यामुळे दिशा मिळणार आहे.


