मुंबई प्रतिनिधी
वेस्टर्न एक्सप्रेस महामार्गावर मंगळवारी सकाळी प्रवाशांनी भरलेल्या एका खासगी बसला अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. मालाड परिसरातील टाइम्स ऑफ इंडिया पुलाजवळ, मेट्रो लाईन ७ (रेड लाईन) च्या पुलाखाली सुमारे सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली. बस आगीच्या भयानक थारोळ्यात सापडल्याने काही काळ परिसरात एकच खळबळ उडाली.
मुंबईहून उज्जैनकडे निघालेली ही खासगी स्लीपर बस महामार्गावरून जात असताना अचानक पेट घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेचे दृश्य टिपणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून, त्यामध्ये पिवळ्या रंगाची बस पूर्णपणे जळताना आणि आकाशात दाट काळ्या धुराचे लोट पसरलेले स्पष्टपणे दिसत आहेत.
आग लागल्यामुळे वेस्टर्न एक्सप्रेस महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक काही काळासाठी पूर्णतः ठप्प झाली होती. सकाळच्या गर्दीच्या वेळी आणि वर्दळीच्या मार्गावर ही घटना घडल्याने वाहनचालक व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मात्र, बसचालक व वाहकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने बस थांबवून सर्व प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी उतरवले. त्यामुळे या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची नोंद नाही.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, वाहतूक पोलीस, स्थानिक पोलीस प्रशासन, मेट्रो प्रशासन तसेच १०८ रुग्णवाहिका सेवेची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाने सुमारे सकाळी १०.३३ वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवत ती पूर्णपणे विझवली.
बसला आग लागण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, शॉर्ट सर्किट किंवा तांत्रिक बिघाडाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर आणि जळालेली बस हटवण्यात आल्यानंतर काही वेळाने वेस्टर्न एक्सप्रेस महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. प्रशासनाच्या तत्परतेमुळे आणि समन्वयामुळे मोठी दुर्घटना टळल्याची भावना व्यक्त केली जात आहे.


