नवी दिल्ली वृत्तसंस्था
देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनासाठी राजधानीतील कर्तव्यपथ सज्ज झाला असून, यंदाचा सोहळा सांस्कृतिक आणि वैचारिक अंगाने विशेष ठरणार आहे. ‘वंदे मातरम’च्या १५० व्या वर्षपूर्तीनिमित्त यंदाच्या प्रजासत्ताक दिन संचलनात भारतीय संस्कृतीचे वैभवशाली दर्शन घडवण्यात येणार आहे.
देशभरातील विविध राज्यांमधून आलेले सुमारे २,५०० कलाकार यंदा आपली कला सादर करणार असून, ‘स्वतंत्रतेचा मंत्र – वंदे मातरम’ आणि ‘समृद्धीचा मंत्र – विकसित भारत’ ही यंदाच्या संचलनाची मुख्य संकल्पना निश्चित करण्यात आली आहे.
या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे सांगीतिक दिग्दर्शन ‘आरआरआर’ चित्रपटासाठी ऑस्कर पुरस्कार प्राप्त संगीतकार एम. एम. कीरावनी यांनी केले आहे. वंदे मातरमच्या ऐतिहासिक प्रवासावर आधारित विशेष संगीत त्यांनी यासाठी साकारले आहे. या सादरीकरणाचे निवेदन ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांच्या आवाजात होणार असून, नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी संतोष नायर यांनी सांभाळली आहे.
कार्यक्रमाचे संपूर्ण संकल्पनात्मक मार्गदर्शन संध्या पुरेचा करत असून, कलाकारांच्या वेशभूषेची जबाबदारी संध्या रमण यांच्याकडे आहे. भरतनाट्यम, कथक, ओडिसी, कुचिपुडी आणि मणिपुरी यांसारख्या पारंपरिक भारतीय नृत्यशैलींचे सादरीकरण यावेळी करण्यात येणार आहे.
दरम्यान, यंदाच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात केंद्र सरकारने ‘व्हीव्हीआयपी’ संस्कृतीला फाटा देत एक नवा पायंडा पाडला आहे. परेड पाहण्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांच्या बैठक व्यवस्थेला यंदा भारतीय नद्यांची नावे देण्यात आली आहेत. गंगा, यमुना, गोदावरी, सिंधू, कावेरी आणि नर्मदा या नद्यांच्या नावाने बैठक विभाग ओळखले जाणार आहेत.
तसेच २९ जानेवारी रोजी होणाऱ्या ‘बीटिंग रिट्रीट’ सोहळ्याच्या बैठक व्यवस्थेला बासरी, डमरू, सतार, वीणा आणि तबला अशा भारतीय वाद्यांची नावे देण्यात आली असून, भारतीय सांस्कृतिक वारशाचा सन्मान करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन आणि युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा हे यंदाच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख अतिथी असतील. संरक्षण सचिव आर. के. सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या निमंत्रण पत्रिकेवर वंदे मातरमच्या १५० व्या वर्षपूर्तीचा विशेष लोगो छापण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या समारोपावेळी आकाशात ‘वंदे मातरम’चा संदेश देणारे बॅनर्स आणि रंगीबेरंगी फुगे सोडण्यात येणार असून, राष्ट्रगीताचे रचनाकार बंकिमचंद्र चॅटर्जी यांना मानवंदना देण्यासाठी मुख्य मंचावर विशेष पुष्पसजावट साकारली जाणार आहे.


