वाई प्रतिनिधी
वाई तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांना मोठा राजकीय धक्का बसला असून, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवलेल्या नेत्या यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. या घडामोडीमुळे वाईसह महाबळेश्वर–खंडाळा परिसरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.
बावधन (ता. वाई) येथे झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत संबंधित नेत्या यांनी शेकडो समर्थकांसह भाजपात प्रवेश केला. भाजपाच्या विकासाभिमुख धोरणांवर विश्वास ठेवून तसेच मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बोलताना मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मध्ये अंतर्गत गटबाजी, निर्णयक्षमतेचा अभाव आणि कार्यकर्त्यांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे अनेक नेते अस्वस्थ होते. भाजप हा विकास, स्थैर्य आणि विश्वासाचा पक्ष असून नव्याने प्रवेश केलेल्या नेत्यांचा पक्षात योग्य सन्मान राखला जाईल. भाजप त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील.”
या पक्षप्रवेशामुळे वाई विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाची ताकद लक्षणीयरीत्या वाढल्याचे चित्र असून, विधानसभा निवडणूक लढवलेल्या उमेदवारानेच पक्ष सोडल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटातील अंतर्गत असंतोष उघडपणे समोर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
या वेळी भाजपचे जिल्हा व तालुकास्तरीय पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.


