मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील ओशिवरा परिसरात मंगळवारी सकाळी घडलेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले. ओशिवरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नालंदा सोसायटीच्या दिशेने एका अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी अनेक जण थोडक्यात बचावले.
गोळीबार केल्यानंतर संशयिताने घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच ओशिवरा पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी तत्काळ परिसराचा ताबा घेत इमारतीला वेढा घातला. फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने घटनास्थळावरील पुरावे गोळा करण्यात आले.
पोलिसांनी नालंदा सोसायटीसह परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज ताब्यात घेतले असून, हल्लेखोराचा मार्ग आणि हालचालींचा मागोवा घेण्यासाठी तांत्रिक विश्लेषण सुरू आहे. प्राथमिक तपासात हा प्रकार वैयक्तिक वादातून घडला की एखाद्या टोळीशी संबंधित आहे, याचा शोध घेतला जात आहे.
हल्लेखोराची ओळख पटवणे आणि गोळीबारामागील नेमका हेतू स्पष्ट करण्यासाठी तपास वेगाने सुरू असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेनंतर परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


