परभणी प्रतिनिधी
लोकशाहीत प्रत्येक मताचे मोल किती असते, याचा प्रत्यय परभणी शहरातील प्रभाग क्रमांक एकच्या निकालाने अक्षरशः दिला. कानाजवळून गोळी गेल्यासारखा थरार अनुभवत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार व्यंकट लक्ष्मणराव डहाळे हे केवळ एका मताने विजयी झाले आणि परभणीच्या राजकीय इतिहासात हा निकाल कायमचा कोरला गेला.
प्रभाग क्रमांक एकमधून डहाळे यांना ४३१२ मते, तर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रसाद केशवराव नागरे यांना ४३११ मते मिळाली. मताधिक्य केवळ एकच. मात्र हा अंतिम निकाल जाहीर होईपर्यंत मतमोजणी केंद्रात विलक्षण तणाव, संशय, आरोप-प्रत्यारोप आणि फेरमोजणीचा थरार अनुभवायला मिळाला.
प्राथमिक मतमोजणीनंतर डहाळे यांचा निकाल काही काळ रोखून धरल्याने वातावरण तापले. फेरमतमोजणीदरम्यान तर क्षणभर डहाळे पराभूत झाल्याचीही चर्चा पसरली. यामुळे उबाठा शिवसेनेचे खासदार संजय जाधव आणि आमदार राहुल पाटील यांनी थेट मतमोजणी कक्षात धाव घेतली. संबंधित अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा करत निकाल का रोखून धरला, याबाबत जाब विचारला.
दरम्यान खासदार जाधव यांनी सत्ताधारी भाजपवर गंभीर आरोप केले. सत्तेच्या बळावर प्रशासनावर दबाव आणून निकाल बदलण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. सुरुवातीला बॅलेटवरील वैध व अवैध मतांची छाननी करण्यात आली. त्यानंतर मतदान यंत्रातील मतांची मोजणी झाली. दोन्ही मिळून डहाळे यांना एका मताने आघाडी मिळाली असताना पुन्हा बॅलेटची मते मोजून गोंधळ घालण्याचा प्रयत्न झाला, असा आरोपही त्यांनी केला.
मतमोजणी कक्षात स्थानिक नेते, अधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. अखेर सर्व प्रक्रियेनंतर प्रभाग क्रमांक एकमधून व्यंकट डहाळे हे एका मताने विजयी झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. त्यांना विजयाचे प्रमाणपत्र देण्यात आले आणि उपस्थितांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
एका मताने पराभव आणि एका मताने विजय यामधील सीमारेषा किती पातळ असते, हे या निकालाने अधोरेखित केले. डहाळे यांच्यासाठी हे एक मत केवळ आकडा नव्हता, तर राजकीय जीवदान ठरले. लोकशाहीत प्रत्येक मत अनमोल असते, याचा हा जिवंत दाखला परभणीकरांनी अनुभवला.


