पुणे प्रतिनिधी
‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेनिमित्त सोमवारी (१९ जानेवारी) पुणे शहरातील प्रमुख रस्ते व उपरस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता (नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्ता), गणेशखिंड रस्ता, जंगली महाराज रस्ता तसेच स्पर्धा मार्गावरील उपरस्ते सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत बंद राहणार आहेत. नागरिकांनी या कालावधीत मेट्रो सेवा तसेच पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.
पुणे जिल्हा प्रशासन आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या संयुक्त विद्यमाने १९ ते २४ जानेवारी दरम्यान ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ या आंतरराष्ट्रीय सायकल शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत ४० देशांतील १७१ स्पर्धक सहभागी होणार आहेत. सोमवारी होणाऱ्या ‘प्रोलॉग’ स्पर्धेमुळे मध्यवर्ती भागातील वाहतुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
सोमवारच्या स्पर्धेचा मार्ग खंडोजी बाबा चौक, नामदार गोपाळ कृष्ण गोखले चौक (गुडलक चौक), तुकाराम महाराज पादुका चौक, ललित महल चौक, चापेकर चौक, रेंजहिल, वेधशाळा चौक, संचेती चौक, जंगली महाराज रस्ता, झाशीची राणी लक्ष्मीबाई चौक ते डेक्कन जिमखाना बस स्थानक असा असणार आहे. या मार्गावरील तसेच लगतच्या रस्त्यांवरील वाहतूक सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील आणि वाहतूक शाखेचे उपायुक्त हिंमत जाधव उपस्थित होते.
अत्यावश्यक सेवांना मुभा
स्पर्धा मार्गावर रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचे बंब, पोलिस वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना वगळता सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. तसेच या मार्गावर दुतर्फा ‘नो-पार्किंग’ लागू राहणार आहे. स्पर्धा मार्गावरील रुग्णालयांशी समन्वय साधण्यात आला असून आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिकांना तातडीने मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे.
पर्यायी मार्ग निश्चित
वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. स्वारगेट, सारसबाग, नळस्टॉप, सेनापती बापट रस्ता, गणेशखिंड, रेंजहिल, खडकी, जुना मुंबई–पुणे रस्ता, पाटील इस्टेट, संगम पूल, आरटीओ, शाहीर अमर शेख चौक, मालधक्का चौक, बोल्हाई चौक, नेहरू रस्ता असा वर्तुळाकार पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शक्यतो मध्यवर्ती भागातील प्रमुख रस्ते टाळावेत, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
पुढील टप्प्यांतही बदल
स्पर्धेचा एक महत्त्वाचा टप्पा २३ जानेवारी रोजी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात होणार असून ९९ किलोमीटरपैकी ५८ किलोमीटरचा मार्ग पुणे शहरातील असेल. त्या दिवशी वाहतूक टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येणार आहे. बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथून स्पर्धेची सुरुवात होऊन जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात समारोप होणार आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील ही स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक ते नियोजन करण्यात आले असून नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी केले आहे.


